Manoj Muntashir On Adipurush: गेल्या काही दिवसांपासून आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या चित्रपटात वापरण्यात आलेले वीएफएक्स आणि या चित्रपटामधील डायलॉग्सला नेटकरी ट्रोल करत आहेत. या चित्रपटाच्या टीमवर अनेकांनी टीका देखील करण्यात आली. आता आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी एक ट्वीट करुन प्रेक्षकांची माफी मागितली आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
मनोज मुंतशीर यांचे ट्वीट
मनोज मुंतशीर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'आदिपुरुष चित्रपटामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या हे मी मान्य करतो. माझ्या सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ, आदरणीय व्यक्ती आणि श्री राम भक्तांची मी हात जोडून बिनशर्त माफी मागतो. भगवान बजरंगबली आपल्या सर्वांना आशीर्वाद देवो, तसेच एक आणि अटूट राहण्याचे आणि आपल्यात पवित्र शाश्वत आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो!
नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
मनोज मुंतशीर यांनी शेअर केलेल्या ट्वीटला कमेंट करुन अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'खूप उशीर झाला आहे. जेव्हा चित्रपट फ्लॉप झाला, तुमच्याकडे जेव्हा गमावण्यासारखे काही उरले नाही, जेव्हा जनतेचा राग स्वतःहून थंड झाला, तेव्हा तुम्ही माफी मागत आहात. हे काम चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच व्हायला हवे होते, पण तेव्हा तुम्ही चित्रपटाचे कलेक्शन मोजण्यात आणि चित्रपटाचा बचाव करून जखमेवर मीठ चोळण्यात व्यस्त होता. आता चित्रपटाची कमाई पूर्णपणे थांबली आहे, त्यामुळे माफी मागत आहात.'
ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आदिपुरुष हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.
संबंधित बातम्या