मुंबई : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका ‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर यांचं निधन झालं. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील राहत्या घरी सोमवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास किशोरी आमोणकर यांची प्राणज्योत मालवली.


संगीत क्षेत्रातील मातब्बरांनीही किशोरीताईंच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.
'किशोरी आमोणकर जी यांचा स्वर्गवास झाल्याचं ऐकून मला अत्यंत दुःख झालं. त्या एक असामान्य गायिका होत्या. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीत जगताची मोठी हानी झाली आहे. इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो' अशा भावना गानकोकिळा लता मंगेशकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

https://twitter.com/mangeshkarlata/status/848968474080751616

'किशोरी आमोणकर यांचं निधन झालं. भारतीय शास्त्रीय संगीताचं अतोनात नुकसान झालं. त्यांची गायकी कायम स्मरणात राहील' अशा भावना प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी व्यक्त केल्या आहेत.

https://twitter.com/Shankar_Live/status/848970666330267648

किशोरी आमोणकर यांचा अल्पपरिचय

किशोरी आमोणकर यांचा जन्म 10 एप्रिल 1931 रोजी मुंबईत झाला. प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर या त्यांच्या आई, तर माधवदास भाटिया हे त्यांचे वडील. आईकडूनच संगीताचं ज्ञान घेतलेल्या किशोरी आमोणकर यांनी पुढे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली.

किशोरी आमोणकर या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. गायन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या किशोरी आमोणकर यांना ‘गानसरस्वती’ असं म्हटलं जातं.

किशोरीताई त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करत. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत असे.

आजवर देशोदेशी आपले संगीत कार्यक्रम केले असून भारतातील प्रमुख संगीत महोत्सवांत त्यांना आपली कला सादर केली. त्यांनी ‘स्वरार्थरमणी – रागरससिद्धान्त’ हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असे मानले जाते.

पुरस्कार :

  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1985

  • पद्मभूषण पुरस्कार, 1987

  • संगीत सम्राज्ञी पुरस्कार, 1997

  • पद्मविभूषण पुरस्कार, 2002

  • संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, 2002

  • संगीत नाटक अकादमी फेलोशिप, 2009


किशोरी आमोणकर यांची गाजलेली गाणी :


  • अवघा रंग एक झाला

  • बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

  • माझे माहेर पंढरी

  • हे श्यामसुंदर राजसा

  • अवचिता परिमळु

  • कानडा विठ्ठल

  • अवघा तो शकुन

  • जनी जाय पाणियासी

  • जाईन विचारित रानफुला

  • पडिलें दूरदेशीं

  • पाहतोसी काय आता पुढे

  • मी माझें मोहित राहिलें

  • या पंढरीचे सुख

  • सोयरा सुखाचा विसांवा