Kiran Mane Join Shiv Sena Uddhav Thackeray : राजकीय वक्तव्यामुळे चर्चेत असणारे मराठमोळे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी शिवसेना उद्धव ठाकरे (Shiv sena Uddhav Thackeray) गटात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून किरण माने राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा होती. अखेर शिवबंधन बांधत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.


शिवसेना सर्वसामान्यांची आहे : किरण माने


उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करत किरण माने म्हणाले,"शिवसेना सर्वसामान्यांची आहे. राजकारण गढून झालेलं असताना एकटा माणूस लढत आहे. त्यामुळे मी एक संवेदनशील अभिनेता म्हणून माणूस म्हणून सोबत येण्याचा निर्णय घेतला आहे". 


किरण माने पुढे म्हणाले,"संविधान वाचवण्यासाठी मी पक्षामार्फत काम करेल. मिळेल ती जबाबदारी घेऊन काम करेल". किरण मानेंनी शिवबंधन बांधल्यानंतर शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले,"तुम्हाला जे पाहावत नाही ते खरं आहे. माने तुमच्याकडे शब्दाची ताकद आहे. आपण दोघेही लढू. सेनेत तुम्हाला पश्चाताप होणार नाही. आलात त्याचा अभिमान वाटेल पुढेही". 


किरण माने यांच्यासह बीड येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनीही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,"बीडच्या निर्भिड शिवसैनिकांनो स्वागत. बीडकडे युतीमुळे आणि मुंडे साहेबांमुळे दुर्लक्ष झालं होतं. मात्र आता पालवी फुटत आहे. त्याचं आता वृक्ष होत आहे. मी लवकरच बीड जिल्ह्यात येणार आहे. कर्जमाफीसाठी बीडमध्ये एक मोर्चा झाला होता. आता शेतकऱ्यांसाठीदेखील एक मोर्चा करणार आहे. तुम्ही नियोजन करा मी येणार. बीड मला पूर्णपणे शिवसेनामय करुन हवं". 


किरण माने कोण आहेत? (Who is Kiran Mane)


किरण माने हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. 'सातारचा बच्चन' म्हणून ते ओळखले जातात. 'सिंधुताई माझी माई', 'मुलगी झाली हो' आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या किरण मानेंवर अनेकदा मोठ्या प्रमाणात टीका होत असते. अनेक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीदेखील गाजवली आहे. किरण माने यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) या कार्यक्रमामुळे किरण माने घराघरांत पोहोचले आहेत. 'मुलगी झाली हो' या मालिकेतून त्यांना राजकीय पोस्ट केल्याने बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.


संबंधित बातम्या


Kiran Mane : अभिनेता किरण माने शिवबंधन हाती बांधणार; ठाकरे गटात करणार प्रवेश