Kiara Advani : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) हिने कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. रेड कार्पेटवरील अभिनेत्रीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पण सध्या कान्समधील (Cannes Film Festival 2024) कियाराचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर कियारा बरचं ट्रोल देखील केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय. कियाराने तिच्या रेड कार्पेटवरील वॉकनंतर मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी तिची इंग्रजी ऐकून नेटकरी चांगलेच संतापले आहेत.
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने शनिवारी रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि व्हॅनिटी फेअर युरोप डिनरमध्ये सन्मानित करण्यात आलेल्या सहा महिलांपैकी कियारा अडवाणी एक होती. यावेळी पिंक कलरच्या ड्रेसमध्ये कियारा सुंदर दिसत होती. तिच्या फोटोंवरही अनेकांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं. पण तिच्या इंग्रजी बोलण्याच्या पद्धतीमुळे तिला बरंच ट्रोल करण्यात आलं आहे.
कियाराचा व्हिडिओ झाला व्हायरल
दरम्यान कियाराने या इव्हेंटमध्ये तिचा उत्साह देखील व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. तिने सुरुवातीला बोलताना म्हटलं की, माझ्या करिअरला दहा वर्ष पूर्ण होतायत आणि हा एक खूपख खास क्षण आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मला कान्समध्ये पहिल्यांदाच सहभागी करुन घेतल्याबद्दल आणि रेड सी फाऊंडेशन फॉर वुमन इन सिनेमाने सन्मानित केल्याबद्दल मी खूप आभारी आहे.
कियारा अडवाणी ट्रोल
कियाराचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तिला चांगलच ट्रोल करण्यात आलं आहे. अनेकांनी कियारावर उगाच दिखावा करत असल्याचा आरोप केलाय. एकाने म्हटलं की, स्वत:च्या भाषेचा वापर करायला लाज वाटते का? तर एकाने म्हटलं की, 'याच्या तुलनेत त्याने स्वतःची भाषा वापरायला हवी होती.'