Sharmishtha Raut : अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) ही नाच गं घुमा या सिनेमाच्या माध्यमातून निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शर्मिष्ठाने आतापर्यंत अभिनेत्री म्हणूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अनेकदा अभियन क्षेत्रात यशाच्या शिखरावर असताना, कलाकार मंडळींना त्यांची पहिली कमाई ही कायम लक्षात राहते. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने देखील तिच्या पहिल्या कमाईबाबत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. इतकचं नाही तर तिने तिची ही पहिली कमाई तशीच जपून ठेवली होती. पण तिने आता ती अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) याला दिली आहे.
शर्मिष्ठा राऊत आणि ललित प्रभाकर यांनी झी मराठी वाहिनीवरील जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत बहिण भावाची भूमिका साकारली होती. तेव्हापासून शर्मिष्ठा ही खऱ्या आयुष्यातही ललितची मोठी बहिण झाली. या दोन्ही बहिण-भावांचं नातं आजही कायम आहे. रक्षाबंधन, भाऊबीज हे सणही दोघं साजरे करत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. इककचं नव्हे तर शर्मिष्ठाने तिची पहिली कमाई देखील ललितला दिली आहे. याबबात शर्मिष्ठाने नुकतच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
शर्मिष्ठाची पहिली कमाई
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ही आता निर्माती म्हणून सिनेक्षेत्रात वावरते. आता तू निर्माती झाली आहेस, त्यामुळे तू आता सगळ्यांचे पेमेंट देतेस, पण तुझा पहिला पगार किती होता? असा प्रश्न शर्मिष्ठाला विचारण्यात आला. त्यावर शर्मिष्ठाने म्हटलं की, मी जेव्हा ज्युनियर आर्टिस्ट होते, तेव्हा मला 500 लोकांच्या घोळक्यात असताना 250 रुपये मिळायचे. ते पाकिट मी मागच्या एक-दीड वर्षांपासून जपून ठेवलं होतं. पण ते आता माझ्याकडे नाही, कारण ते मी माझ्या भावड्याला म्हणजेच ललित प्रभाकरला दिलं.
आणि मी ते पाकिट भावड्याला दिलं - शर्मिष्ठा राऊत
हा अनुभव शेअर करताना शर्मिष्ठाने पुढे म्हटलं की, ललितने आनंदी गोपाळ नावाचा सिनेमा केला. तो पाहिल्यानंतर मी फार भारावून गेले होते. तेव्हा मी त्याला म्हटलं की, यापेक्षा अजून चांगले रोल तू करशीलही, पण हे जे काही केलंय ते खूप भारीये. तेव्हा मी त्याला म्हटलं की मोठी बहिण म्हणून मला बक्षिस द्यायचं आहे. त्याने मला म्हटलं की काय, तेव्हा ते पाकिट मी त्याला दिलं. मी ते पाकिट आणलं आणि त्याला म्हटलं की, ही माझी पहिली कमाई आहे, त्यावर शर्मिष्ठा राऊत कंसात ज्युनियर आर्टिस्ट असं लिहिलं आहे. मी त्याला म्हटलं की, ही माझी पहिली कमाई आहे आणि मी जितकी जपून ठेवली तितकीच तूही जपून ठेवशील अशी खात्री आहे मला.