मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल आपली आई असल्याचा दावा केरळमधील एका 45 वर्षीय महिलेने केला आहे. एवढंच नाही तर तिने कौटुंबिक न्यायालयात 67 वर्षीय गायिका अनुराधा पौडवाल यांच्याविरोधात खटला दाखल करुन 50 कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. करमाला मोडेक्स असं या महिलेचं नाव असून ती तिरुअनंतपुरम इथली रहिवासी आहे.


करमाला मोडेक्सच्या याचिकेनुसार, "मी केवळ चार दिवसांची असताना अनुराधा पौडवाल यांनी मला आई-वडील (पालक) पोंनाचन आणि अॅग्नेस यांच्याकडे सोपवलं होतं. त्यावेळी पार्श्वगायनात व्यस्त असल्यामुळे बाळाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसल्याने त्यांनी असं केलं होतं." करमालाचे वकील अनिल प्रसाद म्हणाले की, "करमाला यांना ज्या बालपणाची आणि आयुष्याची गरज होती, त्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं. जर अनुराधा पौडवाल यांनी दावा फेटाळला तर आम्ही न्यायालयाकडे डीएनए चाचणीची मागणी करणार आहोत."


पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अनुराधा पौडवाल यांनी जवळपास चार दशकांपर्यंत बॉलिवूड गाणी आणि भजन गायली आहेत. त्यांनी संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी विवाह केला. त्यांना आदित्य आणि कविता ही दोन अपत्ये आहेत.


महिलेचा दावा काय?
सुमारे पाच वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी मला सत्य सांगितल्याचा दावा करमाना मोडेक्सने केला आहे. "अनुराधा पौडवाल माझी आई आहे. मी फक्त चार दिवसांची असताना अनुराधा यांनी मला माझ्या पालकांकडे सोपवलं होतं, असं वडिलांनी आपल्याला सांगितल्याचं करमाला म्हणाली. "पोंनाचन सैन्यात होते आणि त्यांची पोस्टिंग महाराष्ट्रात होती. ते अनुराधा पौडवाल यांचे मित्रही होते. मग त्यांची बदली केरळमध्ये झाली," असंही करमालाने सांगितलं.


करमाला मोडेक्सच्या माहितीनुसार, याबाबतचं सत्य माझी आई अॅग्नेसलाही माहित नाही. पोंनाचन आणि अॅग्नेस यांना तीन मुलं आहे. त्यांनी करमालाचं पालनपोषण आपल्या चौथ्या अपत्याप्रमाणे केलं. 82 वर्षीय अॅग्नेस सध्या अंथरुणाला खिळल्या असून त्याअल्झायमरने ग्रस्त आहेत.


पौडवाल यांना फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न, परंतु उत्तर नाही : करमाला
तीन मुलांची आई असलेल्या करमालाचा दावा आहे की, "वडिलांनी सत्य सांगितल्यानंतर आपण अनुराधा पौडवाल यांना अनेक वेळा फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. काही वेळाने माझा नंबरही ब्लॉक केला. आता मी कायदेशीररित्या या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या माझ्या आई आहेत आणि मला त्या माझ्यासोबत हव्या आहेत."


करमालाचे वकील अनिल प्रसाद यांच्या माहितीनुसार, "तिरुअनंतपुरमच्या कौटुंबिक न्यायालयाने अनुराधा पौडवाल आणि त्यांच्या मुलांना 27 जानेवारीला सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे."


अनुराधा पौडवाल यांची प्रतिक्रिया
दरम्यान अनुराधा पौडवाल यांच्याशी संपर्क साधला असता, या आशयाची कोणतीही नोटीस मला मिळालेली नाही. आपण सध्या याबाबत आपल्या वकीलाशी सल्लामसलत करत असून योग्य वेळ आली की मी माझी भूमिका मांडेन, अशी प्रतिक्रिया अनुराधा पौडवाल यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.