'गुड न्यूज'ने पहिल्या दिवशी (शुक्रवारी) 17.56 कोटी रुपयांची ओपनिंग मिळवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) 21.78 कोटी, रविवारी 25.65 कोटी, सोमवारी 13.39, मंगळवारी 16.20, बुधवारी 22.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सहा दिवसात मिळून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 117.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाने अवघ्या 5 दिवसात शंभर कोटी क्लबमध्ये स्थान मिळवलं आहे.
चित्रपटाचा विषय काय?
अलिकडे आपल्याकडे खूप फॅमिली प्लॅनिंग होतं. पाच-पाच सात-सात वर्ष थांबून मग गोड बातमी देण्याबद्दल विषय सुरू होतात. पण यात वय वाढतं. शरीरातही बदल होत असतात. मग अपत्य प्राप्तीची शक्यता धूसर होऊ लागते. अशावेळी सायन्स मदतीला येतं. आयव्हीएफ, टेस्ट ट्यूब बेबी यांसारखे पर्याय येतात. 'गुड न्यूज' या चित्रपटात आयव्हीएफ तंत्रज्ञानाची कास धरून गोष्ट मांडण्यात आली आहे. नामसाधर्म्यामुळे ही टेस्ट करताना एकमेकांचे (अक्षय कुमार - दिलजित दोसांझ) स्पर्म एकमेकांच्या बायकोच्या (करीना कपूर - रकुल प्रीत सिंह) शरीरात सोडले जातात असं याचं कथाबीज. पण याच्या अलिकडे आणि पलिकडे गोष्ट रचून दिग्दर्शकाने धमाल उडवून दिली आहे. लग्नानंतर काळ उलटतो तसे नातेवाईकांकडून मारले जाणारे टोमणे.. अपत्य प्राप्तीसाठी उत्सुक असल्यानंतर विशिष्टवेळी जवळ येण्याचा पत्नीचा ह्ट्ट, यातून यंत्रवत होत जाणारं नातं असे पदर यात मांडले आहेत.