मुंबई : काही दिवसांपूर्वी कोरोनाला मात देऊन घरी परतलेले बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या कामला सुरुवात केली आहे. बिग बी 'कौन बनेगा करोडपति 12' च्या सेटवर परतले असून त्यांनी शुटींगला सुरुवात केली आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.


कोरोनामुक्त झाल्यानंतर कामावर परतले बीग बी


अभिनेता अमिताभ बच्चन यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर आता आपल्या कामाला पुन्हा नव्या जोमाने सुरुवात केली आहे. बिग बी यांनी आज सेटवर शुटींग दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये 'कौन बनेगा करोड़पति 12'च्या सेटवरील सर्व लोक पीपीई किटमध्ये दिसून येत आहेत. तसेच अमिताभ बच्चन यांनी केबीसीची 20 वर्ष शानदार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, 'कौन बनेगा करोडपति 12' हा शो 2000 मध्ये सुरु झाला होता.


सोशल मीडियावर दिली माहिती


अमिताभ बच्चन यांनी शुटींग सुरु करत असल्याची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून फॅन्सला दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी 'सुरुवात झाली... बॅक टू वर्क आणि केबीसी 12' असं म्हणत स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे.





अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिलं आहे की, 'कामावर पुन्हा परतलो आहे. निळ्या पीपीई किटच्या समुद्रामध्ये... केबीसी 12... 2000 पासून सुरु झालं होतं... आज साल 2020मध्ये 20 वर्ष पूर्ण होत आहेत.'





दरम्यान, अमिताभ बच्चन त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय-बच्चन आणि नात आराध्या यांना कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ यांनी रुग्णालयात बराच काळ उपचार घेतल्यानंतर त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आता अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आणि नात आराध्या पूर्णपणे ठिक आहेत.