मुंबई : सोशल मीडियावर शिळ्या कढीला कधी ऊत येईल, सांगू शकत नाही. अभिनेत्री करिना कपूरचा अत्यंत जुना व्हिडिओ सध्या पुन्हा वायरल झाला आहे. निमित्त असू शकतं आगामी लोकसभा निवडणुकांचं. कारण या व्हिडिओमध्ये करिना कपूर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना डेट करण्याची इच्छा असल्याचं म्हणाली होती.

हा व्हिडिओ आहे 2002 सालचा. म्हणजेच तब्बल 17 वर्ष जुना. त्यानंतर पुलाखालून प्रचंड पाणी वाहून गेलंय. मात्र करिना आणि राहुल यांचे लिंक अप जोडण्याची खुमखुमी असलेल्या नेटिझन्सना आयतं खाद्य मिळालं.

2000 साली जे. पी. दत्तांच्या 'रेफ्यूजी' चित्रपटातून करिनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'रांदेव्हू विथ सिमी गरेवाल' या त्या काळी चर्चेत असलेल्या चॅट शोमध्ये अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी करिनाला आमंत्रित केलं होतं. हा टॉक शो सध्याच्या 'कॉफी विथ करण' सारखा.

सिमी गरेवाल यांनी करिनाला कोणत्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाला डेट करायला आवडेल? असा प्रश्न विचारला. त्यावर 'मी हे सांगावं का मला कळत नाही, माझी हरकत नाही, हे वादग्रस्त आहे. राहुल गांधी...' असं करिना बोलून गेली. सिमी यांनीही आश्चर्य व्यक्त केलं.

'मला राहुल गांधींना जाणून घ्यायला आवडेल. मी त्यांचे फोटो मॅग्झिनमध्ये पाहत होते आणि माझ्या मनात आलं, यांच्याशी गप्पा मारायला कसं वाटेल? मी फिल्म्सचा वारसा असलेल्या एका कुटुंबातून आले आहे, तर राजकीय वारसा असलेल्या घरातून. त्यामुळे आमच्या गप्पा रंजक ठरु शकतात.' असं पुढे करिना म्हणाली होती.



ही मुलाखत देताना करिना अवघ्या 22 वर्षांची अवखळ तरुणी होती. म्हणजे सैफची मुलगी सारा अली खान सध्या आहे, त्यापेक्षाही तरुण. श्रीदेवीची कन्या जान्हवी कपूर आहे साधारण त्याच वयाची.

2002 मध्ये राहुल गांधी होते 32 वर्षांचे. त्याकाळी राजकारणात त्यांचा लवलेशही नव्हता. 2004 साली राहुल गांधींनी राजकारणात एन्ट्री घेतली. दिवंगत पिता राजीव गांधींच्या अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत त्यांनी खिंड जिंकली होती.

बरं, 2002 सालच्या मूळ मुलाखतीतील हा छोटा भाग पुन्हा अपलोड झाला, तो 2014 साली. म्हणजेच गेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी. त्यानंतर तो थेट पुन्हा चर्चेत आला यंदाच्या निवडणुकांच्ये वेळी.

त्यानंतर करिना आणि शाहीद कपूरच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. त्यांचं ब्रेकअप झालं आणि 2012 मध्ये करिना सैफसोबत विवाहबंधनात अडकली. तिला तैमूर नावाचा मुलगाही झाला. म्हणजेच कितीतरी बदल घडले आहेत, काळाच्या ओघात.

17 वर्षांपूर्वी सोशल मीडियाचा 'स'ही नसतानाचा हा काळ. अशा काळात 22 वर्षांच्या नवोदित अभिनेत्रीने केलेलं एखादं वक्तव्य 'गाडलेल्या मृतदेहां'प्रमाणे उकरुन काढायचं आणि वायरल करुन संबंधितांना ट्रोल करायचं, हाच सोशल मीडियाचा महिमा आहे का, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.