मुंबई : मीटू (#MeToo )चळवळीवर आधारीत चित्रपट बनवला जाणार आहे. विशेष म्हणजे मीटू चळवळीमुळे अभिनेते आलोक नाथ यांचा खरा चेहरा समोर आला. आलोक नाथ यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले गेले. तेच आलोक नाथ या मीटू (#MeToo )वर आधारित चित्रपटात न्यायाधीशाची भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात आलोक नाथ लैंगिक शोषण कसं अयोग्य आहे यावर चित्रपटाच्या शेवटी भाषणही देणार आहेत.


कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण, छेडछाड यांना वाचा फोडण्यासाठी जगभर मीटू (#MeToo )चळवळ सुरु झाली. या चळवळीमुळे अनेक गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यात अडकले. विशेष म्हणजे या चळवळीमुळे हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गजांचं पितळ उघडं पडलं. अनेकांचा खरा चेहरा समोर आला. बॉलिवूडमध्ये संस्कारी बाबूजी अशी ओळख असणाऱ्या आलोक नाथ यांच्यावरही बलात्काराचा आरोप झाला.

बॉलिवूडमधील #MeToo मोहिमेवर 'मैं भी' हा चित्रपट येत आहे. नासिर खान याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याबाबत आलोक नाथ यांनी सांगितले की, मी काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे शुटींग पूर्ण केले आहे. या चित्रपटाला कोणताही विरोध न करता प्रदर्शित होऊ द्या, अशी मागणीदेखील आलोक नाथ यांनी केली आहे.

'मैं भी' या चित्रपटात आलोक नाथ यांच्यासह खालिद सिद्दीकी, मुकेश खन्ना, शावर अली, शाहबाज खान आणि इम्रान खान यांच्या मुख्य भूमिका आहेत.

पाश्चिमात्य देशांमध्ये दोन वर्षांपूर्वी मीटू चळवळ सुरु झाली. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने भारतात या मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर मीटू च्या वादळात अनेक मोठ्या लोकांची, अभिनेत्यांची, दिग्दर्शकांची नावे पुढे आली. अभिनेते आलोक नाथ यांच्यावर दिग्दर्शिका- निर्मात्या विनता नंदा यांनी बलात्काराचे आरोप केले, नंदा यांच्यांतरही काही अभिनेत्रींनी पुढे येत आलोक नाथ यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत.

#MeToo : संस्कारी बाबू आलोकनाथ यांच्यावर सहा महिन्यांची बंदी