मुंबई : खरंतर सगळं शांत होतं. पण कपिल शर्माच्या शोमध्ये करण जोहरने एक कोपरखळी कतरिनाला काय मारली, पुन्हा एकदा तिच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यात अफेअर असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. पण कपिल शर्माच्या शोमध्ये करण जोहरने कतरिनाला मारलेल्या कोपरखळीने विकी आणि कतरिनाच्या अफेअरवर जणूकाही शिक्कामोर्तब झालं आहे.
कतरिना आणि विकी कौशल फारसे एकत्र दिसलेले नाहीत. गेल्या डिसेंबरमध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीत विकी-कतरिना एकत्र आले होते. पण पार्टी झाल्यावर ते वेगवेगळे घरी गेले होते. त्यानंतर कतरिनाच्या घरी नाताळची पार्टी होती तेव्हाही विकी तिथे हजर होता. त्याच्यासोबत कतरिनाचे इतर मित्रही होते. पण त्यानंतर दोघेही एकत्र दिसले नव्हते.
कपिल शर्माच्या शोमध्ये परवा सूर्यवंशी या सिनेमाची टीम आली होती. त्यावेळी या शोमध्ये करण जोहर, रोहित शेट्टी, कतरिना कैफ, अक्षयकुमार हे आले होते. कपिलने करणला विकी करत असलेल्या भूत चित्रपटाचा किस्सा विचारला होता. त्या चित्रिकरणावेळी इतकं भीतीदायक वातावरण होतं की, करणने विकीला घट्ट मिठी मारली होती. हा किस्सा सांगताना, करण कतरिनाला सॉरी म्हणाला, यावर अक्षयने तू कतरिनाला का सॉरी म्हणतोय असं विचारल्यावर... म्हणावं लागतं बाबा... कारण यांच्या घरी सगळं कौशल मंगल आहे. अशी टिप्पणी केली होती. यावर जोरदार हशा पिकला होता.
कतरिना आणि विकीचं अफेअर असल्याच्या बातम्या येत असल्या तरी दोघांनीही यावर मौन बाळगलं आहे. आता तर त्यांच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यातही काही तथ्य नसल्याचं दोघांच्या पीआर टीमकडून अनधिकृतरित्या सांगण्यात आलं आहे. यापूर्वी विकी-कतरिना चर्चेत आले कारण, या दोघांनाही एका दिवसाच्या फरकाने कोविड झाला होता. त्यातून ते बरेही एका दिवसाच्या फरकानेच झाले होते. पण त्यानंतर या दोघांची तितकी चर्चा नाही.
कतरिना कैफचं नाव यापूर्वी अनेक नायकांबरोबर जोडलं गेलं आहे. सलमान खान, रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा आदी अनेक कलाकारांसोबतच्या तिच्या अफेअर्सच्या चर्चा झडल्या. आता सध्या विकी आणि कतरिना यांचं अफेअर सुरु असल्याचं बोललं जातंय. पण त्याला पुष्टी अद्याप मिळालेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :