मुंबई : कोरोनामुळं देशभरात लॉकडाऊनची स्थिती आहे. कोरोनाची आकडेवारी कमी होत चालली असली तरी स्थिती चिंताजनक आहे. लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळं चित्रपटगृहं बंद आहेत. अशात बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांच्या रिलीजचं शेड्युल पुन्हा गडबडलं आहे. यामुळं अनेक बड्या सिनेमांचं प्रदर्शन कधी होणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागून आहे.  


अभिनेता अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' या चित्रपटाचं प्रदर्शन 30 एप्रिल रोजी तर 'बेल बॉटम' 28 मे रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळं दोन्ही सिनेमांची रिलीज होण्याची तारीख पुन्हा टळली आहे.  अशात आता चर्चा होत आहे की, कोरोना कमी झाल्यानंतर अक्षय कुमारचे हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित केले जातील. 


मात्र आता अक्षय कुमारनं याबाबत एक पत्रक जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे.  अक्षय कुमारनं एबीपी न्यूजला दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे की,  सूर्यवंशी आणि बेलबॉटमच्या रिलीजबाबत माझ्या चाहत्यांमध्ये  उत्सुकता आणि आतुरता वाढीस लागली आहे. हे पाहून मी खूप आनंदी आहे आणि यामुळं मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. मात्र सध्या हे दोन्ही सिनेमे यंदा स्वातंत्र्य दिनी रिलीज केले जातील, असे अंदाज बांधले जात आहेत. दोन्ही सिनेमांचे निर्माते रिलीजच्या तारखेसंदर्भात प्रयत्न करत आहेत आणि योग्य वेळी या तारखांची घोषणा केली जाईल, असं अक्षयनं सांगितलं आहे.  


लॉकडाऊनमुळं अक्षय कुमार-कटरीना कैफ स्टारर सिनेमा 'सूर्यवंशी' मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील निश्चित केलेल्या तारखेला प्रदर्शित होऊ शकलेला नाही. या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यासंदर्भात देखील चर्चा झाल्या होत्या. मात्र सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमा  ओटीटी वर रिलीज करण्याच्या वृत्ताला नकार दिला आहे. 


याचप्रमाणं अक्षयच्या बेल बॉटमबद्दल देखील अशाच अफवा सुरु होत्या. ज्यावर आता अक्षयनं स्पष्टीकरण दिलं आहे.