मुंबई : एकिकडे महाराष्ट्रात चित्रिकरण सुरु व्हावं अशी मागणी मनोरंजन क्षेत्रातल्या विविध संघटनांनी केली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातली कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता आणि येत्या काळात असणारे निर्बंध पाहता अनेक मोठ्या निर्मात्यांनी परदेशात जाण्यावर भर दिला आहे. धाकड हा चित्रपट त्यापैकी एक आहे. धाकड या चित्रपटाची सगळी टीम उर्वरित चित्रिकरणासाठी हंगेरीला जाणार आहे. यासंदर्भातली सगळी तयारीही आता पूर्ण झाली आहे. 


याबद्दल निर्माते दीपक मुकुट यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या चित्रपटाचं 30 ते 35 दिवसांचं चित्रिकरण हंगेरीतल्या बुडापेस्ट इथे करायचं नियोजित केलं असून, तीन मोठे एक्शन सिक्वेन्स तिकडे शूट होणार आहेत. यात चित्रपटातल्या नायिकेची एंट्रीही असण्याची शक्यता आहे. शिवाय, सिनेमाचा क्लायमॅक्सही तिकडेच चित्रित होणार आहे. 


या चित्रिकरणासाठी हंगेरीला जाणाऱ्या सर्व टीम मेम्बर्सचं लसीकरण झालं आहे. पूर्ण काळजी घेऊन या चित्रपटाचं चित्रिकरण केलं जाणार आहे. पहिल्या लॉकडाऊनवेळी अक्षयकुमारने आपल्या बेलबॉटम या चित्रपटाचं चित्रिकरणही परदेशात केलं होतं. त्यावेळीही सगळी सिनेमाची टीम कोणताही संसर्ग न होता परत भारतात आला होता. धाकडबद्दलही तशाच पद्धतीचं नियोजन असणार आहे. या चित्रिकरणासाठी कंगना 10 जूनच्या आसपास बुडापेस्टला जाणार आहे. या तीन अॅक्शन सिक्वेन्ससाठी दक्षिण कोरियन अॅक्शन दिग्दर्शकाला पाचारण करण्यात आलं आहे.  


कंगना रनौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिच्या आगामी 'थलाइवी' चित्रपटाबाबत चर्चा सुरु आहे. कंगनाच्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात कंगना दिवंगत अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ए.एल. विजय आहेत. तिचा हा चित्रपट गेल्या एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. याशिवाय कंगना 'धाकड' नावाच्या चित्रपटातून सुद्धा झळकणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :