मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनीविरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कोविड-19 विषयक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 आणि 34 अंतर्गत टायगर श्रॉफ, दिशा पाटनी यांच्यासह त्यांच्या काही मित्रांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. 


टायगर श्रॉफ आणि आणि दिशा पाटनी त्यांच्या काही मित्रांसह वांद्र्यातील बॅण्ड स्टॅण्ड परिसरात फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्याचवेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखलं आणि चौकशी केली. परंतु कोणतंही योग्य कारण ते सांगू शकले नाहीत, त्यामुळे मुंबई पोलिसांना त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा लागला.
 
मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये टायगर श्रॉफ, दिशा पाटनी आणि त्यांच्या काही मित्रांविरोधात कोविड 19 महामारी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. कारण त्यांच्याविरोधात लावलेली कलमं ही जामीनपात्र आहेत, त्यामुळे त्यांना अटक करणं गरजेचंच आहे असं नाही. पोलीस सध्या पुढील कारवाई करत आहेत.


दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी आहे. लोकांनी एकत्र येऊ नये आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच जर एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी मित्रांसोबत जमल्यास तिथे गर्दी होणं साहजिकच आहे. चाहते त्यांचं अनुकरण करत असतात. त्यामुळे किमान सेलिब्रिटींनी तरी भान जपून वागलं पाहिजे अशी प्रतिक्रिया उमटत आहे.