Kangana Ranaut In Majha Katta : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. राजकारणात एन्ट्री करण्याबद्दल एबीपी माझाच्या महा कट्टादरम्यान कंगना म्हणाली,"समाजकार्य करण्याची मला आवड आहे. त्यामुळे राजकारणात काम करण्यासाठी मी पात्र आहे की नाही हे लोक ठरवतील. मी कायम अभिनय क्षेत्रात काम करत राहणार. पण देशासाठी राजकारणात काम करायला मला नक्कीच आवडेल. त्यामुळे देशाचा विचार करुन, देशाला माझी गरज असेल तर मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल. जर मला कोणी ऑफर दिली तर मी नक्कीच या गोष्टीचा विचार करेल".
बॉयकॉट ट्रेंडवर कंगना काय म्हणाली? (Kangana Ranaut On Boycott Trend)
बॉयकॉट ट्रेंडबद्दल बोलताना कंगना म्हणाली,"देशाची लोकसंख्या खूप जास्त आहे. त्यातील एक टक्के लोक सोशल मीडियावर आहेत आणि त्यातील खूप कमी लोक बॉयकॉट ट्रेंड सुरू करणारे आहेत. त्यामुळे बॉयकॉट ट्रेंडचा सिनेमावर परिणाम होतो, असं मला वाटत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून आता अनेक मंडळी सेलिब्रिटी झाले असून ते कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. मी तरी सोशल मीडियाचा कामापुरता वापर करते".
हातातल्या सत्तेचा चुकीच्या पद्धतीने वापर करत माझं घर पाडण्यात आलं : कंगना रनौत
गेल्या काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंचं सरकार असताना कंगनाच्या घराचा काही भाग मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाणे पाडला होता. त्यावेळी कंगना म्हणाली होती,"आज माझं घर पाडलं आहे, उद्या तुमचा गर्व मोडून पडेल. प्रत्येकाची वेळ येते.. लक्षात असूद्या". आता त्यावर 'एबीपी माझा'च्या महाकट्टा कार्यक्रमात कंगनाने भाष्य केलं आहे. ती म्हणाली,"माझं घर अशाप्रकारे पाडलं जाईल असा मी कधी विचार केला नव्हता. हातातल्या सत्तेचा चुकीच्या पद्धतीने वापर करत माझं घर पाडण्यात आलं. आता घर तोडल्याची नुकसान भरपाईदेखील मला नको आहे".
कंगना रनौत म्हणाली,"मी कोणत्या व्यक्तीची बाजू घेत नाही. माझं नुकसान होत असलं तरी देशाचा विचार करुन एखाद्या गोष्टीवर मी व्यक्त होत असते. माझं मत अनेकांना खटकतं. माझी लढाई एखाद्या व्यक्तीसोबत नसून त्या व्यक्तीच्या विचारांसोबत आहे. गेल्या काही दिवसांत नवोदित कलाकारांना संधी मिळत आहे, महिलाप्रधान सिनेमांची निर्मिती होत आहे ही आनंदाची बाब आहे. भारतीय असल्याचा मला अभिमान आहे".
संबंधित बातम्या