कलंक.. माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया, वरुण, सोनाक्षी, आदित्य रॉय-कपूर आदी मंडळी एकत्र येतात त्यावेळी काहीतरी भन्नाट असेल असं वाटून जातं. पण कलंकची एकेक गोष्ट बाहेर येऊ लागते. म्हणजे, ही गोष्ट 1940 च्या दशकातली आहे. म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातली. त्यातल्या त्यात ही गोष्ट आत्ताच्या पाकिस्तानात घडते. त्यामुळे या सिनेमात हिंदू लोक अल्पसंख्याक दिसतात. हा एक त्यातल्या त्यात बदल. सिनेमाचं निर्मितीमूल्य भयंकर उच्च आहे. त्याचा तामझाम, कलादिग्दर्शन जोरदार आहे. खूप खूप पैसा खर्च केला गेलाय या सिनेमावर. अभिषेक वर्मन यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. हा सगळा भाग असला तरी गोष्ट आणि त्यानिमित्ताने उभी केलेली कॅरेक्टर्स याचा काही ताळमेळ असतो हेच दिग्दर्शक विसरला आहे. म्हणजे, गाणी, फायटिंग, रोमान्स, रडारड हवी म्हणून यात प्रसंग घातले आहेत. पण त्याता तार्किक संगती काही असायला हवी याचा विसर दिग्दर्शकाला पडला आहे. अगदी साधी बात अशी, की गोष्ट 1944 ते 1946 मध्ये घडते. या गोष्टीत कलाकारांच्या तोंडी भारत पाकिस्तान फाळणी, जिनांची भूमिका आदी गोष्टी दिसतात. पण संपूर्ण सिनेमात इंग्रज अधिकारी, इंग्रज शिपाई नावालाही दिसत नाही. परिणामी वातावरण निर्मिती अजिबात होत नाही. राजघराणी दाखवून हा सिनेमा आजही घडवता आलाच असता असं वाटून जातं. असो.

आता थेट गोष्टीवर येऊया. गोष्ट अशी, की सत्या चौधरी या देव चौधरी यांच्या पत्नीला कॅन्सर झाला आहे. तिच्या हातात आता केवळ एक वर्ष आहे. आपल्या निधनानंतर आपल्या पतीने दुसरा विवाह करावा अशी तिची इच्छा आहे. त्यासाठी तिने निवड केली आहे रूपची. रूप ही एका गायकाची मुलगी. तिने आधी वर्षभर आपल्या घरी रहावं आणि नंतर देवशी लग्न करावं अशी सत्याची इच्छा. पण आधी लग्न करा आणि मग घरी घेऊन चला असा रूपचा आग्रह. जो मानला जातो. आणि रूप देवच्या घरी येते. देवचा जीव सत्यावर आहे. 'मै आपको इज्जत दे सकता हूं, लेकीन प्यार नही' असं तो आधीच सांगून टाकतो. आणि मग त्या गावात रूपची गाठ पडते ती जफरशी. 'मला फक्त प्रेम करायचंय, लग्न नाही' असं जफर सांगून टाकतो. त्यामुळे इथे सगळं आधीच क्लिअर होतं. मग पुढे काय होतं त्या फॅमिलीचं.. भारत-पाक फाळणीची धग त्यांना लागते का याची ती गोष्ट आहे. आता गोंधळ होऊ नये म्हणून सत्या, देव, रूप आणि जफर यांच्या भूमिका अनुक्रमे सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, अलिया भट आणि वरूण धवन यांनी केल्या आहेत.

अतिभव्य नृत्यकाम, उत्तम संवाद, श्रीमंती कलादिग्दर्शन आदी गोष्टी जमेच्या आहेत. पण यातली गोष्ट पचता पचत नाही. आपल्या तत्वांशी ठाम असलेली रूप चौधरी कुटुंबात आल्यानंतर पहिल्या भेटीत जफरने रूपचा आहत भरे बाजारमे धरणं.. संपादक असलेल्या देवनं दारू पिऊन उत्तम टपोरी असल्यासारखा नाच करणं.. कमालीच्या दु:खात असलेल्या बहार बेगमनं नको तेव्हा नाचकाम करणं.. जफरचं बाकी सब फर्स्ट क्लास हे.. म्हणतं कंबर उडवणं.. हे सगळं भयंकर अपचनी आहे. यात आणखी एक ब्रेकिंग न्यूजही आहे. यात बहार बेगम आणि देवचे वडील बलराज यांचा एक वेगळाच ट्रॅक आहे. पेपरमध्ये काम करणाऱ्या संपादक फाळणीला विरोध करत असणं हे मान्य आहे. पण त्याचवेळी गावातल्या लोहारांचं आपलं असं म्हणणं आहे, ते मांडायला त्यानं नकार देणं हे अत्यंत हास्यास्पद आहे. विनाकारण प्रसंग तयार केल्याचं ते एक उदाहरण. अनेक सिनेमे प्रोड्युस केल्यानंतर करण जोहरसारखा दिग्दर्शक लॉजिक न वापरून सिनेमा बनवू लागला आहे, असं खेदानं वाटू लागतं.

अभिनयाबाबत अलिया भटने पुन्हा मैदान मारलं आहे. तिचा अभिनय काबिले तारीफ आहे. त्याला आदित्य रॉय-कपूरची साथ आहे. सरप्रायझिंगली कुणाल खेमूनं आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. वरूण धवन या सिनेमात वरूणच वाटतो. संजय दत्तने बापाचं बेअरिंग नेटकं साधलं आहे. या सिनेमात माधुरीची गल्लत झाली आहे. म्हणजे, यात त्यांना अभिनयही आहे आणि नाचही. पण तो नाच इतक्यावेळा येतो की अभिनय मागे पडतो. आणि नाचाबाबत मात्र आता मजा येत नाही. पटकथा ढिसाळ. यातला संवाद खुसखुशीत आहे. पण करण जोहरवर बाहुबलीचा इम्पॅक्ट आहे. या सिनेमातही त्याने बुल फाईट घेतली आहे. पण त्याचं व्हीएफएक्स अत्यंत अशक्त झालं आहे. यातल्या हवेल्या, त्याचं इंटेरिअर भारी आहे. पण हा भाग कुठला आहे. तेच कळत नाही. हे सगळं उभं केलंय हे कळतं. एकूणात, सिनेमा श्रीमंती असला तरी पूर्ण अपचन करतो.

पिक्चर-बिक्चरमध्ये या चित्रपटाला आपण देतो आहोत दोन स्टार्स. मोठे कलाकार, भरपूर पैसा असूनही गोष्ट चांगली नसली तर त्याचं भरीत होतं हे या  सिनेमातून लक्षात येतं. बाकी आप की मर्जी.