मुंबई : बलात्काराचा आरोप असलेल्या माणसाला सिनेमात का घेतलं? महिलांबाबत त्यावेळी दाखवलेला कळवळा खोटा होता का? विनता नंदा यांच्या जखमेवर मीठ का चोळलं? असे संतप्त सवाल अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने उपस्थित केले आहेत. तनुश्रीच्या प्रश्नांचा रोख बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणकडे आहे.


'मीटू' चळवळीने जोर धरला होता, तेव्हा दर मिनिटाला नवनवीन नावं समोर येत होती. त्यावेळी अजय देवगणने केलेलं ट्वीट त्याची प्रतिमा उंचावणारं होतं.

'मीटूच्या निमित्ताने सध्या जे काही घडतंय, त्याने मी खूपच अस्वस्थ झालो आहे. महिलांना सर्वोत्तम सुरक्षा आणि आदर मिळाला पाहिजे या मताचा मी आणि माझी कंपनी आहे. जर कोणी महिलांसोबत गैरवर्तन केलं, तर मी किंवा माझी कंपनी कधीच गैरकृत्य करणाऱ्याच्या बाजूने उभे राहणार नाही.' अशा आशयाचं ट्वीट अजयने केलं होतं.


अजयच्या याच ट्वीटचा आधार घेत तनुश्रीने थेट निशाणा साधला आहे. जर गैरकृत्य करणाऱ्याला पाठीशी घालणार नाही असं अजय देवगणचं म्हणणं असेल, तर मग आलोकनाथला त्याने आपल्या सिनेमात का घेतलं? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.

अजय देवगणच्या आगामी 'दे दे प्यार दे' या सिनेमात अभिनेता आलोकनाथ झळकणार आहेत. त्यांच्या जागी इतर कोणाला घेता आलं नसतं का? किंवा सिनेमातले त्यांचे रिशूट करता आले नसते का? असंही तनुश्री विचारते.

तनुश्रीने उपस्थित केलेल्या प्रश्नांना अद्याप अजय देवगणने काहीच उत्तर दिलेलं नाही, आणि ते देण्याची शक्यताही नाही. बॉलिवूडसाठी मीटू हे तात्पुरतं घोंगावलेलं वादळ होतं, जे त्यांच्यासाठी शमलं आहे. त्यामुळे दुर्दैवाने 'ये रे माझ्या मागल्या' असंच म्हणावं लागेल.