Kader Khan : बॉलिवूडच्या दमदार अभिनेत्याच्या यादीत कादर खान (Kader Khan) यांचा समावेश आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 200 पेक्षा अधिक सिनेमांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. विनोदी पात्रांसह खलनायकाची भूमिका देखील त्यांनी उत्तम वठवली आहे.


दमदार डायलॉग ठरली कादर खान यांची ओळख!


कादर खान हे त्यांच्या दमदार डायलॉग आणि भूमिकांसाठी ओळखले जातात. डिसेंबर 2018 मध्ये कादर खान यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी आजही त्यांचे सिनेमे चाहते आवडीने पाहतात. त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 


कादर खान यांचं व्यावसायिक करिअर उत्तम झालं असलं तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. अत्यंत गरीबीत त्यांचं बालपण गेलं आहे. पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या त्यांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्याचं वैयक्तिक आयुष्य खूपच खडतर होतं. मुंबईतील झोपडपट्ट्यांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे यशस्वी अभिनेत्यापर्यंत येऊन पोहोचला. 


कादर खान यांचा जन्म बलूचिस्तानमध्ये झाला आहे. श्म्स उर रहमान, फजल रहमान आणि हबीब उर रहमान असे कादर यांचे तीन भाऊ आहेत. अफगानिस्तानमध्ये कादर यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या काही वर्षांनी त्यांच्या आई-वडिलांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. भारतात आल्यानंतर मुंबईतील कामाठीपुरा या रेड लाईट एरियामधील झोपडपट्टीत त्यांचं बालपण गेलं. बालपणातच त्यांना ड्रग्ज, हाणामारी, मर्डर अशा अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. कादर तीन वर्षांचे असताना त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. 


कादर खान यांची स्ट्रगल स्टोरी (Kader Khan Struggle Story)


घटस्फोटानंतर कादर खान यांच्या आईने दुसरं लग्न केलं. सावत्र वडिलांनी मात्र कादर यांना प्रचंड त्रास दिला. कादर यांनी त्यांच्या खऱ्या वडिलांकडून सारखे पैसे मागावे यासाठी सावत्र वडिल खूप वेगवेगळे प्रयत्न करत असे. कादर डोंगरीतील मशिदीबाहेर भीक मागत असे. त्या पैशांवर त्यांचं घर चालत असे. 


दिलीप कुमारांनी दिली सिनेमाची ऑफर


गरीबी असूनही कादर खान यांनी शिक्षण सोडलं नाही. मुंबईतील इस्माइल युयुफ महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर एका महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून रुजू झाले. दरम्यान त्यांनी नाटकांमध्ये काम कराया सुरुवात केली होती. त्यांचं काम पाहून दिलीप कुमार यांनी त्यांना सिनेमाची ऑफर दिली होती. 


कादर खान यांनी 1973 मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. मुकद्दर का सिकंदर, कुली, शहंशाह अशा अनेक सुपरहिट सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. कादर खान आणि गोविंदा या जोडीने एका पेक्षा एक सिनेमे दिले आहेत. कादर खान यांची 2018 मध्ये प्राणज्योत मालवली.


संबंधित बातम्या


अभिनेते कादर खान यांची प्रकृती खालावली