JNU Film Poster Released : आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून दुसरीकडे बॉलिवूडमध्ये राजकीय विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. एक विद्यापीठ देश तोडू शकते का असा सवाल करत जेएनयू चित्रपटाचे पोस्टर (JNU Film Poster Released) लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटातील जेएनयू हे जहांगीरदार नॅशनल युनिर्व्हसिटी असे आहे. या चित्रपटातून मराठी अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) बॉलिवूडपटात झळकणार आहे.
जेएनयू चित्रपटाच्या पोस्टरने लक्ष वेधून घेतले आहे. शिक्षणासोबत विविध राजकीय, सामाजिक मुद्यांवर भाष्य ते विद्यार्थ्यांची चळवळ यासाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रसिद्ध आहे. मात्र, मागील 10 वर्षांपासून जेएनयूमध्ये देशविरोधी कारवाया सुरू असल्याचा आरोप सातत्याने उजव्या विचारांचे पक्ष, संघटनांकडून करण्यात आला. जेएनयू या चित्रपटातही याचे प्रतिबिंब असल्याची चर्चा सुरू आहे.
जेएनयू चित्रपटाच्या पोस्टरमध्ये काय?
जेएनयू चित्रपटाच्या पोस्टरमध्ये 'एक विद्यापीठ देश तोडू शकतो का' असा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर, कॅप्शनमध्ये शिक्षणाच्या भिंती आडून देश तोडण्याचा कट शिजतो. डावी आणि उजव्या विचारसरणीत संघर्ष झाल्यास वर्चस्वाची लढाई कोण जिंकेल असा सवाल करण्यात आला आहे.
चित्रपटात कोणाच्या भूमिका, कधी होणार प्रदर्शित?
या चित्रपटात रवी किशन, पियूष मिश्रा, रश्मी देसाई, उर्वशी रौतेला, सिद्धार्थ बोडके, सोनाली सहगल, विजय राज आदी कलाकारांच्या भूमिका आहे. तर, विनय शर्मा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, प्रतिमा दत्ता यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय?
चित्रपटाच्या पोस्टर लाँचिंगनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एका युजरने नाराजी व्यक्त करताना म्हटले की, पियूष मिश्रासारखा कलाकार या चित्रपटात असल्याचे पाहून मन तुटलं आहे. सरकार एका विद्यापीठासोबत लढतंय यावर तुम्हाला विश्वास वाटेल का? तर, एका युजरने म्हटले की, बॉलिवूडचा प्रपोगंडा आता उच्च स्तरावर पोहचला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत उजव्या विचारांचा चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे एकाने म्हटले.
तर, एका युजरने हा चित्रपट ब्लॉकबस्टर होणार असल्याचे म्हटले. एका प्रतिष्ठित विद्यापीठात कसा देशविरोधी कट शिजतोय हे समोर येत असल्याचे या युजरने म्हटले.