Kaala Paani Web Series Teaser Out : 'काला पानी' (Kaala Paani) ही बहुचर्चित वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर आऊट झाला आहे. मोना सिंह (Mona Singh) आणि आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) अभिनीत या सीरिजचा ट्रेलर खूपच दमदार आहे.
'काला पानी'चा टीझर कधी होणार रिलीज? (Kaala Paani Web Series Teaser Out)
'काला पानी' या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा अमित गोलानीने सांभाळली आहे. तर सक्सेना, बिस्वपती सरकार आणि सौरभ खन्ना यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या सीरिजची झलक शेअर करण्यात आली आहे. वेब सीरिजची झलक शेअर करत टीझरदेखील शेअर करण्यात आला आहे. 18 ऑक्टोबर 2023 रोजी ही सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'काला पानी' या सीरिजमध्ये प्रेक्षकांना अंदमान निकोबार द्वीप समूहातील रोमांचक प्रवास पाहायला मिळणार आहे.
'काला पानी'च्या टीझरमध्ये काय आहे?
'काला पानी' या वेबसीरिजच्या टीझरमध्ये एक माणूस जंगलात धावताना दिसत आहे. अशातच एका फ्रेममध्ये मराठमोळा अभिनेता अमेय वाघची (Amey Wagh) एन्ट्री होते. या टीझरमध्ये अमेय पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. पुढे एक आदिवासी अनुष्यबाण रोखून धरताना दिसतो. नंतर बाहेरून एक तुरुंग दिसतो. या सीरिजमध्ये आशुतोष गोवारीकर आणि मोना सिंह यांची झलक पाहायला मिळत आहे. 'काला पानी' या सीरिजमध्ये नक्की काय पाहायला मिळणार हे स्पष्ट कळत नसलं तरी ही सस्पेस्न थ्रिलर वेबसीरिज असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
'काला पानी' या सीरिजबद्दल बोलताना आशुतोष गोवारीकर म्हणाले,"काला पानी' या सीरिजचं स्वत: एक विश्व आहे. अशा पद्धतीच्या एका कलाकृतीचा आणि नेटफ्लिक्सचा भाग होत असल्याचा मला आनंद आहे. या सीरीजसाठी मी खूप उत्सुक आहे. समीर, अमित आणि बिस्वपती यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. प्रेक्षकदेखील या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत".
'काला पानी' या सीरिजबद्दल बोलताना मोना सिंह म्हणाली,"काला पानी' ही सीरिज माझ्यासाठी खूप खास आहे. या वेबसीरिजमध्ये तुम्हाला थरार, नाट्य आणि अॅक्शन पाहायला मिळेल. समीर, अमित आणि नेटफ्लिक्सच्या टीमचा भाग असल्याचा मला आनंद आहे. या सीरिजचं उत्तम कथानक आहे".
मराठी कलाकारांची फौज असलेली 'काला पानी'
'काला पानी' या सीरिजमध्ये मोना सिंह, आशुतोष गोवारीकर, अमेय वाघ, सुकांत गोयल, विकास कुमार, अरुशी शर्मा, राधिका मेहरोत्रा, चिन्मय मांडलेकर आणि पूर्णिमा इंद्रजीत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या