सिनेमात प्राणी वापरायचे असतील तर त्याची रीतसर परवानगी घ्यावी लागते बोर्डाकडून. त्यासाठी वेगळं बोर्ड नेमलं गेलं आहे. अगदी बेडूक, कोंबडी, बकरी, बैल, कुत्रा असं काहीही सिनेमात वापरायचं असेल तर त्याची परवानगी आणि प्राण्यांची घेतली जाणारी काळजी ही सतत पुरावे म्हणून दाखवावी लागते. आता तुम्ही म्हणाल सिनेमाच्या समीक्षेच्या सुरुवातीला हे कुठं आलं मध्येच. तर हे महत्त्वाचं आहे. कारण जंगली या चक रसेल या अमेरिकन दिग्दर्शकाच्या सिनेमता थेट हत्तीच वापरण्यात आले आहेत. केवळ एक नाही तर निदान 8 हत्ती तरी इथे दिसतात. या सगळ्यांना घेऊन सिनेमा करणं हे खायचं काम नाही. याबद्द्ल त्यांचं आधी अभिनंदन. जंगली या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा माणूस आणि हत्तीचं नातं अधोरेखित होतं आहे. विद्युत जामवाल हा अत्यंत चपळ नट या चित्रपटाचा हिरो असल्यामुळे या सिनेमात हाणामारी असणार यात शंका नाही. पण ही हाणामारी कुतूहल वाढवते कारण यात या नायकाच्या समोर अतुल कुलकर्णी असतो. आपल्या पूजा सावंतचा हा पहिला हिंदी चित्रपट असल्यामुळे या सिनेमाबद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटतो. असो.
हा सिनेमा हत्तींभवती फिरतो. एका अभयारण्यात हत्तींची प्रजाती वाढवण्यासाठी, हत्तींना वाचवण्यासाठी काही लोक काम करत आहेत. त्यापैकी एक आहेत नायकाचे वडील. वडिलांबाबत एक अढी मनात धरुन नायकाने दहा वर्षांपूर्वीच घर सोडलेलं आहे. काही कारणाने नायकाचं या जंगलात परत येणं होतं. तेव्हा त्याचा जीवाभावाचा मित्र हत्ती भोला आता मोठा झाला आहे. कळपाचा राजा झाला आहे. सगळं आनंदी असताना केशव नावाच्या शिकाऱ्याची नजर भोलाच्या दातावर पडते. यातून शिकारी आणि नायक असं युद्ध रंगतं. या युद्धाची गोष्ट म्हणजे जंगली.
सिनेमाची गोष्ट फार महत्त्वाची आहे. सिनेमातलं जंगल, हत्ती, कलादिग्दर्शन, संगीत, संकलन, स्टंट या सगळ्या बाजू नेटक्या आहेत. चक रसेल यांची या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी महत्वाची आहे. म्हणूनच सिनेमाचा पूर्वार्ध देखणा आहे. अडचण आहे ती उत्तरार्धाची. कारण पूर्वार्धात त्यांनी आपल्याला सांगायची ती सगळी गोष्ट सांगून टाकली आहे. मग उत्तरार्धात उरते ती केवळ हाणामारी. म्हणून दोन भागांच्या तुलनेत उत्तरार्ध ओसाड वाटतो. कारण त्यात गोष्ट नाही. यातली हाणामारी कमाल आहे. विद्युतची चपळाई विस्मयचकीत करते. पण यात गोष्ट मागे पडते. यातली पोलिस स्टेशनमधली मारामारी मस्त झाली आहे. पण दुसऱ्या भागात हे स्टंट दाखवताना सरधोपट गोष्टी घडत जातात. खलनायकाने हिरोइनला उचलणं.. मग हिरोचा पाठलाग.. शेवटी हत्ती येणं.. याचा आपल्याला अंदाज येतो.
विद्युत जामवालला अभिनयापेक्षा स्टंट फार आवडतात. ते तो कमाल करतो. पूजा सावंत हे या निमित्ताने सरप्राईज पॅकेज आहे. तिचा वावर अत्यंत विश्वासू आहे. हिंदी सिनेसृष्टीला या निमित्ताने नवी नायिका मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही. अतुल कुलकर्णी यांचा खलनायक केशवही राग येणारा. आपल्या डोळ्यांचा योग्य वापर त्यांनी यात केला आहे.
पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळताहेत अडीच स्टार्स. उत्तरार्धातल्या घटनांमध्ये थोडी गोष्ट आली असती तर जास्त मजा आली असती. अटीशर्तींसह.. सिनेमाचा उद्देश चांगला आहे. हस्तीदंतासाठी हत्तींची होणारी शिकार हा महत्वाचा विषय यात मांडला आहे. हत्ती, जंगल, स्टंट आणि अर्थात अतुल कुलकर्णी, पूजा सावंत यांना पाहण्यासाठी हा सिनेमा एकदा थिएटरमध्ये पाहायला हरकत नाही.