Jhund Collection Opening Weekend : नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने नटलेला 'झुंड' सिनेमाच्या पहिल्या आठवड्याच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. 'झुंड' या सिनेमाने पहिल्या आठवड्यात सहा कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली आहे. 'झुंड'ने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळेच कमाईचा आकडा वाढलेला पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांची 'झुंड' प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. परिणामी वास्तवाचं चित्रण करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 


झुंड सिनेमाची पहिल्या आठवड्यातील कमाई
नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'झुंड' (Jhund) 4 मार्च रोजी प्रदर्शित झाला. अपेक्षेनुसार या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पहिल्या दिवशी चित्रपटाने 1.50 कोटी रुपये कमवले. तर या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी 2.10 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर रविवारी म्हणजेच ६ मार्च रोजी सिनेमाने 2.90 कोटींचा गल्ला जमवला. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या 'झुंड'ने यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.


दिवस पहिला (4 मार्च) : 1.50 कोटी
दिवस दुसरा (5 मार्च) : 2.10 कोटी
दिवस तिसरा (6 मार्च) : 2.90 कोटी



इतर सिनेमांकडूनही 'झुंड'ला टक्कर
दरम्यान 'झुंड'ला चहूबाजूंनी आव्हांनाचा सामना करावा लागत आहे. दक्षिणेतील दोन चित्रपटांनी आधीच बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. त्यातच आलिया भटचा गंगूबाई काठियावाडी चित्रपटही दमदार कमाई करत आहे. याशिवाय हॉलिवूड चित्रपट बॅटमॅनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. एकाच वेळी एवढे चित्रपट प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांची आपोआप विभागणी झाल्याचं दिसतं. त्यामुळे आगामी दिवसात बॉक्स ऑफिसवर 'झुंड'ची कामगिरी कशी असेल आणि चित्रपट किती कमाई करेल हे पाहावं लागेल.


विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित 'झुंड'
अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे म्हणून वेगळी छाप सोडली आहे. 'स्लम सॉकर' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावरुन हा चित्रपट प्रेरित आहे. विजय बारसे यांनी त्यांच्या एनजीओच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांमध्ये फुटबॉल हा ग्लोबल खेळ लोकप्रिय केला आणि त्यांना खेळण्याची हिंमत देऊन त्यांचे जीवन समृद्ध केले.


दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी 'झुंड'ची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. इतकंच नाही, तर ते या चित्रपटातही अभिनय करताना दिसले आहेत. 'झुंड' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच 'सैराट' फेम आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु या कलाकारांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 'झुंड' हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. 'झुंड'ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज यांनी केली आहे. अजय-अतुल या लोकप्रिय जोडीने संगीताची धुरा सांभाळली आहे.


आमीर खानकडून बिग बींच्या नावाची शिफारस!
'झुंड' (Jhund) या चित्रपटाची शिफारस आमीर खाननेच बिग बींकडे केली होती आणि त्यांना त्यासाठी तयार देखील केले होते. 'झुंड' चित्रपटाची स्क्रिप्ट आमीरने ऐकली आणि त्याने तो इतका प्रभावित झाला की, अमिताभ बच्चन यांना चित्रपट करण्याची शिफारस केली आणि ते या भूमिकेसाठी कसे योग्य आहेत, हे पटवूनही दिले. अमिताभ हे झुंडसाठी एक परिपूर्ण निवड आहेत, याची आमीरला खात्री होती.