नवी दिल्ली : जेम्स बाँड फेम हॉलिवूड अभिनेते पियर्स ब्रॉसनन यांनी भारतीय ब्रँडच्या पान मसाला कंपनीकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. पान मसाला आरोग्यासाठी घातक ठरु शकतो, हे कंपनीने सांगितलं नव्हतं, असा दावा ब्रॉसनन यांनी केला.


पियर्स ब्रॉसनन पान मसाल्याच्या जाहिरातीत झळकल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही करण्यात आलं होतं. दिल्ली सरकारने पियर्स ब्रॉसनन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

ब्रॉसनन यांनी दिल्ली राज्य तंबाखू नियंत्रण विभागाला उत्तर दिलं आहे. 'पान मसाला कंपनीने माझी फसवणूक केली. कंपनीने आपल्या उत्पादनामुळे होणारं नुकसान आणि जाहिरातीच्या करारातील इतर नियम आणि अटींबाबत खुलासा केला नव्हता' असं ब्रॉसनन यांनी म्हटल्याचं आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक एसके अरोरा यांनी सांगितलं.

'पान बहार'कडून दिशाभूल, 'जेम्स बाँड' पियर्स ब्रॉसनन नाराज

'कंपनीसोबत आपला करार पूर्ण झाला आहे. अशा अभियानांविरोधात कुठलीही मदत आणि समर्थन देण्याची तयारी ब्रॉसनन यांनी दर्शवली' असंही अरोरा म्हणाले.

पियर्स ब्रॉसनन यांनी 1995 ते 2002 या काळात बाँड सीरिजमधले चार चित्रपट केले होते. एक उत्तम अभिनेता म्हणून त्यांची जगभरात ओळख आहे. मात्र पान तंबाखूची जाहिरात स्वीकारल्यामुळे भारतात आपली प्रतिमा नकारात्मक झाल्याचं, त्यांनी म्हटलं होतं.

पान मसाला कंपनीचे संचालक आणि अधिकाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई का करु नये, अशी विचारणाही सरकारने पान मसाला कंपनीला केली.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व नामांकित व्यक्ती (सेलिब्रेटी) आणि मास मीडिया एजन्सींकडे पान मसाला, चहा, वेलची आणि अन्य पदार्थांच्या नावाखाली तंबाखूच्या सरोगेट जाहिरातींमध्ये सहभागी न होण्याचं आवाहन केलं आहे.