'पुण्यातील सलमानच्या कार्यक्रमाला लाऊडस्पीकरची परवानगी नको'
एबीपी माझा वेब टीम | 15 Mar 2018 02:24 PM (IST)
परीक्षांचा काळ सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी पुण्यातील सलमानच्या कार्यक्रमाला लाऊडस्पीकरची परवानगी न देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुणे : अभिनेता सलमान खानच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी लाऊडस्पीकरला परवानगी देऊ नका, अशी मागणी स्थानिक नगरसेवकाने पोलिसांकडे केली आहे. परीक्षांचा काळ सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. येत्या शनिवारी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे सलमान खान यांचा 'दबंग टूर' कार्यक्रम पार पडणार आहे. त्यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी 55 डेसिबलपेक्षा अधिक क्षमतेचा लाऊड स्पीकर बसवण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असं पत्र नगरसेवक अमोल बालवडकर यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनला दिलं. शिवजयंती, दहीहंडी, गणेशोत्सव काळात पोलिसांनी आवाजाची मर्यादा ओलांडलेल्या मंडळांवर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र लाखो रुपयांची कमाई करणाऱ्या आयोजकांना आश्रय दिला जातो, अशी खंत बालवडकरांनी व्यक्त केली आहे. राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या असल्या, तरी पाचवी ते नववीच्या परीक्षा सुरु आहेत, त्यामुळे ध्वनीक्षेपकाला परवानगी नाकारावी, अशी मागणी त्यांनी पत्रातून वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना केली आहे.