मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या फॅन फॉलोईंगचा अंदाज लावणं सोपं नाही. आवडत्या अभिनेत्यासोबत फोटो काढण्यासाठी, हात मिळवण्यासाठी किंवा ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहते काहीही करण्यास तयार असतात. पण काही दिवसांपूर्वीच सलमानच्या घरी एका तरुणीने अतिशय धक्कादायक प्रकार केला. ही तरुणी तीक्ष्ण हत्यार घेऊन सलमान खानच्या घरात घुसली. इतकंच नाही तर तिने आत्महत्येची धमकीही दिली.
काही दिवसांपूर्वी दुपारी सुमारे 12.30 च्या सुमारास एक तरुणी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या घरात घुसली. त्यावेळी सुरक्षा अतिशय कमी होती. ज्यावेळी तरुणी सलमानच्या घरात घुसली त्यावेळी केवळ दोनच गार्ड ड्यूटीवर होते. त्यापैकी एका गार्डच्या निष्काळजीपणामुळे ही तरुणी आत घुसून गॅलेक्सी अपार्टमेंटच्या गच्चीच्या दिशेने धावू लागली.
यादरम्यान, तिने सलमान खानच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि सलमान माझा नवरा आहे, असं ओरडू लागली. काय गोंधळ सुरु आहे हे पाहण्यासाठी सलमानचा आचारी बाहेर आला, पण तोपर्यंत तरुणी गच्चीवर पोहोचली होती. इतकंच नाही तर तिच्या हातात तीक्ष्ण हत्यार होतं. तसंच तिने आत्महत्येची धमकीही दिली होती.
तरुणीचा गोंधळ पाहून सुरक्षारक्षकांनी अग्निशमन दलाला बोलावलं. योग्यावेळी कारवाई करत तरुणीला सलमानच्या घरातून बाहेर काढलं. मात्र ही तरुणी कोण होती, तिने असं का केलं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.