Jagjit Singh And Chitra Singh Love Story: मैफिलींमधून थेट घराघरांत गझल पोहोचवणारे दिग्गज गझलकार जगजीत सिंह (Jagjit Singh) म्हणजे, गझलप्रेमींचं दैवत. जेवढे ते त्यांच्या गझल आणि गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. तसेच, त्यांचं वैयक्तिक आयुष्याही तेवढंच चर्चेत होतं. पंजाबमधून एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या जगजित सिंह यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या निर्णयांनी अनेक सामाजिक चौकटी मोडल्या. अनेक चालीरितींच्या विरोधात जाऊन ते आपलं आयुष्य जगले, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही निर्णयांनी त्यांचं मन खूपच सुखावलं, पण काही निर्णयांनी त्यांचं मन अगदी हेलावून गेलं. पण, शेवटपर्यंत त्यांनी आपल्या तत्वांशी अजिबात तडजोड केलेली नाही. ते नेहमीच आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहिले. एखादी गोष्ट करताना किंवा निर्णय घेताना, त्यांनी कधीच समाजाचा विचार केला नाही.
इंडस्ट्रीतले जाणकार जगजीत सिंहांच्या अनेक रोखठोक निर्णयांबद्दलचे किस्से सांगतात. यापूर्वी आपणंही अनेकदा त्यांचा रोखठोक स्वभाव आणि निर्णयाचे किस्से ऐकले आहेत. असाच एक किस्सा म्हणजे, जगजीत सिंह यांनी गायिका चित्रा सिंह यांच्यासी बांधलेली लग्नगाठ. महत्त्वाचं म्हणजे, ज्यावेळी चित्रा सिंह (Chitra Singh) यांच्याशी जगजीत सिंह यांनी लग्न केलं, त्यावेळी त्या विवाहित होत्या. पण, चित्रा सिहं यांच्याशी लग्न केल्यानंतर मात्र, जगजीत सिंह यांनी त्यांची साथ कधीच सोडली नाही.
प्रेमगीतं विशेषतः सुमधूर गझल्ससाठी ओळखले जाणारे जगजीत सिंह आजच्या पिढीलाही तेवढेच आपलेसे वाटतात. त्यांच्या गझल अगदी प्रत्येकाच्याच अंर्तमनाचा ठाव घेतात. न उमर की सीमा हो, न जनम का हो बंधन... जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन..., त्यांच्या गझलमधल्या या ओळी आपला आवाज आणि शब्दांनी प्रत्येकाच्याच काळजाचा ठाव घेणाऱ्या जगजीत सिंह यांनीच लिहिल्या आहेत. खरं तर या केवळ ओळी नाहीत, तर या ओळींमध्ये जगजीत सिंह यांच्या जीवनाचा अर्थही सामावला आहे. जगजीत सिंह, चित्रा सिंह यांच्या प्रेमात पडले, तेव्हा चित्रा यांचं लग्न झालं होतं. त्यांना एक मुलही होतं.
दोघांची भेट कशी झाली?
चित्रा सिंह यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, जगजीत सिंह यांच्यासोबतची त्यांची पहिली भेट एका स्टुडिओमध्ये झाली होती. त्यावेळी एक जिंगल गायची होती. जगजीत यांचा आवाज ऐकल्यानंतर चित्रा सिंह यांनी त्यांच्यासोबत गाणं गाण्यास नकार दिला होता. या दरम्यान 1668 मध्ये चित्रा सिंह यांच्या वैवाहित आयुष्यात खूपच गोंधळ सुरू होता. त्यावेळी त्यांनी आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांचा काडीमोड झाला, त्यानंतर चित्रा सिंह यांनी आपल्या मुलीची कस्टडीसुद्धा मिळवली.
चित्रा सिंह यांच्या गाण्यासोबतच त्यांच्या पर्सनॅलिटीवरही जगजीत सिंह यांचा जीव जडला होता. त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता चित्रा सिंह यांच्यासमोर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. पण, चित्रा सिंह यांनी जगजीत सिंह यांना नकार दिला. चित्रा यांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या जगजीत सिंह यांनी मग चित्राच्या नवऱ्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करायचं ठरवलं. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मला तुझ्या पत्नीशी लग्न करायचंय, असं जगजीत सिंह यांनी थेट चित्रा यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीला विचारलं होतं.
पुढे जाऊन जगजीत सिंह आणि चित्रा सिंह यांनी 1969 मध्ये लग्न केलं. आणि मुलगा विवेकला जन्म दिला. पण, दोघांच्याही कुटुंबीयांनी या लग्नाचा स्वीकार केला नाही. एक गमतीशीर गोष्ट म्हणजे, चित्रा सिंह जगजीत यांना पापा म्हणायच्या आणि जगजीत सिंह चित्रा यांना मम्मी म्हणायच्या.
जगजीत सिंह आणि चित्रा सिंह यांच्या आयुष्यात सर्व काही ठिक सुरू होतं. पण जुलै 1990 मध्ये एक वाईट बातमी समोर आली. या बातमीमुळे दोघांचं आयुष्य जणू थांबल्यासारखं झालं. एका भीषण अपघातात त्यांचा मुलगा विवेक त्यांना सोडून निघून गेला. अवघ्या 21 व्या वर्षी मुलानं जग सोडल्यामुळे दोघेही हादरुन गेले होते. त्यानंतर दोघांनी स्वतःला बराच काळ संगीत, गाण्यापासून दूर ठेवलं. चित्रा सिंह यांनी तर गाणं सोडूनच दिलं. त्यांनी कित्येक वर्षापूर्वी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं होतं की, माझ्या गळ्यातून सूर उमटणं तर आपोआप बंद झालं होतं.
जगजीत सिंह यांना सप्टेंबर 2011 मध्ये ब्रेन हॅमरेज झालं होतं. त्यांच्यावर अनेक दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांना वाचवता आलं नाही. 10 ऑक्टोबर 2011 रोजी सुरांचा बादशाह आणि आपल्या गाण्यांनी असंख्य भारतीयांच्या मनावर राज्य करणाऱ्या जगजीत सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. पण, आजही त्यांच्या गझल्सनी आपल्या सर्वांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :