कोल्हापूर : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या आगामी 'टॉयलेट- एक प्रेमकथा' चित्रपटाच्या ट्रेलरवरुन प्रेरणा घेत त्याच्या चाहत्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. कोल्हापूरच्या दोन तरुणांनी गरजूंसाठी शौचालय बांधून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

कोल्हापुरातील सचिन पटेल आणि वीजेंद्र सिंह या दोघांनी पदरचे पैसे खर्च करुन बावडामधील गरजू राहुल माळीसाठी शौचालय बांधलं. पटेल याने सिमेंट, खडी, वाळूचा खर्च उचलला, तर वीजेंद्रने सॅनिटेशन, गवंडी कामगार, फरशी इत्यादीचा 20 हजार 250 रुपयांचा खर्च पेलला. 12 दिवसात शौचालय बांधण्याचं काम करण्यात आलं. अक्षयकुमारवरील प्रेमापोटी दोघांनी हे सत्कार्य केलं.

चाहत्यांच्या सामाजिक जाण दाखवल्याने अक्षयकुमारही काहीसा भारावला आहे. त्याने ट्वीट करुन दोघांचं कौतुक केलं आहे. तुमच्यासारखे चाहते असल्याचं अभिमान आहे, असं अक्षयकुमारने म्हटलं आहे. टॉयलेट एक प्रेमकथामध्ये अक्षयसोबत भूमी पेडणेकर असून सिनेमा 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

अक्षयकुमारच्या 'टॉयलेट- एक प्रेमकथा' या चित्रपटातून स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देण्यात आला आहे. यातून प्रत्येक घरात शौचालय असण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अक्षयचं कौतुक केलं होतं.

2011 च्या लोकसंख्या आकडेवारीनुसार भारतात फक्त 46.9 टक्के नागरिकांच्या घरी शौचालय आहे. 49.8 टक्के नागरिक उघड्यावर शौचाला जातात. उर्वरित 3.3 टक्के नागरिक सार्वजनिक टॉयलेटचा वापर करतात.

https://twitter.com/akshaykumar/status/874543874709962752

संबंधित बातम्या :


अक्षय कुमारच्या सिनेमाचं नाव ऐकून मोदींनाही हसू अनावर!


'अक्षयच्या 'टॉयलेट'च्या दिग्दर्शकाची जीभ कापा, 1 कोटी मिळवा'