मुंबई : क्रिकेट आणि मनोरंजन विश्वाचं नातं नवीन नाही. शर्मिला टागोर-पतौडींपासून हरभजन-गीता, विराट-अनुष्का अशी असंख्य उदाहरणं सापडतील. काही जोडपी विवाहबंधनात अडकली, तर काहींचं जुळता-जुळता राहून गेलं. क्रिकेटच्या विश्वातील एका उगवत्या ताऱ्याचंही एका अभिनेत्रीशी प्रेम जुळल्याची चर्चा आहे. किंबहुना 'प्रेमम्' जडलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. टीम इंडियाचा धडाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याचं दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरमसोबत अफेअर असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.

जसप्रीत बुमराह सध्या आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. 25 वर्षांच्या या युवा क्रिकेटपटूसाठी स्टेडियममध्ये बसलेल्या फॅन्सकडून 'माझ्याशी लग्न कर' असे फलकही झळकावले जातात. मात्र जसप्रीतचा जीव जडला आहे, तो अभिनेत्री अनुपमावर. 'प्रेमम' या मल्ल्याळम चित्रपटामुळे अनुपमा प्रकाशझोतात आली.

जसप्रीत आणि अनुपमा यांनी ट्विटरवर एकमेकांना फॉलो करायला सुरुवात केल्यानंतर चाहत्यांच्या माना वळल्या. अनुपमाने मात्र या अफवांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. बुमराहचं नाव यापूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री राशी खन्नासोबतही जोडलं जात होतं. मात्र तिनेही या अफवा धुडकावून लावल्या होत्या.

बुमराह सध्या इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बुमराहने चमकदार कामगिरी करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता मैदानाबाहेर जसप्रीतची जोडी कोणाबरोबर जमणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.