नुसरत 16 जूनला आपल्या कुटुंबासोबत तुर्कीला रवाना होणार आहे. बोडरममध्ये 18 जूनला मेहंदी आणि संगीत सोहळा रंगणार आहे. नुसरतच्या कोलकात्यातील घराबाहेर आतापासूनच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
नुसरतची खास मैत्रीण आणि तृणमूल खासदार मिमी चक्रवर्तीही या लग्ना सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. खरं तर याच कालावधीत लोकसभेचं अधिवेशन सुरु असेल. या सोहळ्याला टॉलिवूडचे अनेक कलाकारही हजर राहण्याची शक्यता आहे. मात्र मायदेशीही नुसरत रिसेप्शनचं आयोजन करु शकते.
नुसरत एका साडीच्या जाहिरातीचं शूटिंग करत असताना तिची आणि निखिल जैन यांची भेट गेल्या वर्षी दुर्गा पूजेदरम्यान झाली होती. दोघांमध्ये असलेलं मैत्रीचं नातं फुलत गेलं आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. काही महिन्यांच्या रिलेशनशीपनंतर दोघांनीही विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
नुसरत जहांने बंगाली चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगली ओळख निर्माण केली आहे. 2011 मध्ये 'शोत्रु' सिनेमातून तिने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर खोका 420, जमाई 420, खिलाडी, क्रिसक्रॉस, नकाब, लव्ह एक्स्प्रेस अशा अनेक चित्रपटांत तिने भूमिका साकारल्या आहेत.
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नुसरत आणि मिमी या दोघींनी संसदेबाहेर आपआपल्या ओळखपत्रांसह फोटोसेशन केलं होते. त्यांनी केलेल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट सोशल मीडियावर वायरल झाल्या होत्या. नेटिझन्सनी दोघींवर टीकेची झोड उठवली होती. संसद हे फोटोशूट करण्याची जागा नाही, याचं भान बाळगण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला होता.