मुंबई: उरी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम देण्यास विरोध दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. 'ए दिल है मुश्किल'सारखे चित्रपट उरी हल्ल्यापूर्वी बनून तयार होते. पण पाकिस्तानी कलाकारामुळे याच्या प्रदर्शनाला तीव्र विरोध होत आहे. यावरुन या चित्रपटातील मुख्य अभिनेता रणबीर कपूरचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांनी आपल्या वक्तव्याद्वारे एकच खळबळ उडवून दिली आहे.


एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ऋषी कपूर म्हणाले की, ''मला नुकतीच एका पाकिस्तानी चित्रपटाची ऑफर होती. पण, भारत-पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मी ही ऑफर नाकारली.''

पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घालण्यासंदर्भातील मागणीवर ऋषी कपूर म्हणाले की, ''पाकिस्तानी कलाकारांना त्यावेळी भारत सरकारच्यावतीने दिलेले ऑफिशियल परमिट होते. मात्र, सध्याची परिस्थिती जरा वेगळी आहे. पाकिस्तानी कलाकारांनी उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर शोक व्यक्त करण्यासही नकार दिल्याचा खेद वाटतो. याप्रकारच्या तणावामुळे दोन्ही देशांना नुकसान होईल. यावर लवकरात लवकर तोडगा निघेल अशी मला आशा आहे.''

ते पुढे म्हणाले की, ''माझ्या मते, या विषयावर सरकार कोणताही निर्णय घेईल, त्याचे आपण सर्वांनी समर्थन केले पाहिजे. मात्र, अशा चित्रपटांना बंदी घालू शकत नाही, जे यापूर्वीच बनून तयार आहेत. एक चित्रपट बनवण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात, हे आपल्याला समजले पाहिजे. मलाही एका पाकिस्तानी चित्रपटाची ऑफर होती. मात्र, ती मी न करण्याचा निर्णय घेतला. कारण माझ्या देशाला हे रुचणार नाही. मला भारतीय असल्याचा गर्व आहे, आणि जर पाकिस्तान एक दहशतवादी देश आहेत, तर कोणत्याही प्रकारे त्याचा हिस्सा बनणे मला मान्य नसेल.''