मुंबई : सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या 'केदारनाथ' चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे उद्या शुक्रवारी (07 डिसेंबर) हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे सिनेमातील कलाकारांसह, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.

या चित्रपटात हिंदूच्या पवित्र अशा मंदिरावर आधारित लव्हस्टोरी दाखवली आहे. हे दाखवणं चुकीचं असल्याचा आरोप करत अॅड. रमेशचंद्र मिश्रा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सेन्साॅर बोर्डाने चित्रपटाचं पुन्हा परीक्षण करावं, तोपर्यंत प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी प्रमुख मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मात्र, 'आम्ही या चित्रपटाचं परीक्षण केलेलं असून त्यात काहीही आक्षेपार्ह नाही. जी अनावश्यक दृश्य होती ती आधीच वगळण्यात आली आहेत,' असं सीबीएफसीने आपल्या युक्तिवादात म्हटलं.


आजच्या सुनावणीदरम्यान निर्मात्यांतर्फे सिनेमाचं पोस्टरही हायकोर्टासमोर दाखवण्यात आलं. त्यात कोणतीही आक्षेपार्ह बाब नसल्याचं सांगण्यात आलं. जे काही भाग वगळायचे त्याच्या सूचना सीबीएफसीने केल्या होत्या. त्यानुसार ते भाग वगळण्यात आल्याने धार्मिक भावना दुखावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं निर्मात्यांनी हायकोर्टात सांगितलं. तसंच ही एक साधी सरळ प्रेमकथा असून यातील पात्र काल्पनिक असल्याचं सिनेमाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे या सिनेमामुळे कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, असंही निर्मात्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठानं याचिका फेटाळून लावत सिनेमा प्रदर्शित करण्यास हिरवा कंदील दिला.