Heeramandi First Look Out : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) हे बॉलिवूडचे लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आहेत. त्यांच्या बिग बजेट सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता असते. आता 'हीरामंडी' (Heeramandi) या सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी ते सज्ज आहेत. या सीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अशातच निर्मात्यांनी या बहुचर्चित सीरिजचा फर्स्ट लूक आऊट केला आहे. 


'हीरामंडी'चा फर्स्ट लूक आऊट! (Heeramandi First Look Out)


'हीरामंडी' या सीरिजचा फर्स्ट लूक आता आऊट करण्यात आला आहे. संजय लीला भन्साळींच्या सिनेमांची एक खासियत असते. 'बाजीराव मस्तानी', 'देवदास' अशा अनेक सिनेमांतील त्यांच्या भव्यदिव्य सेट्सने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता 'हीरामंडी'मध्येही प्रेक्षकांना शाही थाट, आकर्षक मांडणी, नाट्यमय भव्यदिव्य सेट पाहायला मिळणार आहे. 


'हीरामंडी'चं कथानक काय? (Heeramandi Story)


'हीरामंडी' या सीरिजमध्ये रेड लाईट एरियाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झालेली नव्हती तेव्हा अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानातील स्त्रिया 'हीरामंडी'मध्ये स्थायिक झाल्या होत्या. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना राजकारण, प्रेम आणि फसवणूक अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. एकंदरीतच या सीरिजची कथा भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर आधारित आहे. 


संजय लीला भन्साळी 'हीरामंडी'बद्दल बोलताना म्हणाले,"हीरामंडी' ही माझ्या आजवरच्या करिअरमधील एक महत्त्वाची कलाकृती आहे. एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारी ही सीरिज आहे. एक महत्त्वकांक्षी, भव्य सीरिज आहे. त्यामुळे या सीरिजसाठी मी खूप उत्सुक आहे. गेल्या 14 वर्षांपासून मी या सीरिजवर काम करत आहे. नेटफ्लिक्सच्या माध्यमातून आता ही सीरिज जगासमोर येणार आहे".


'हीरामंडी'ची स्टारकास्ट काय? (Heeramandi Starcast)


'हीरामंडी' या सीरिजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, ऋचा चड्ढा, शर्मिन सहगल आणि संजीदा शेख हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अद्याप या सीरिजची रिलीज डेट समोर आलेली नाही. 2024 मध्येच ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. 


'हीरामंडी'आधी संजय लीला भन्साळी यांचा 'गंगूबाई काठियावाडी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात आलिया भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत होती. 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा पाचवा सिनेमा ठरला. आलियासह या सिनेमात अजय देवगन, शांतनु माहेश्वरी, विजय राज, इंदिरा तिवारी, सीमा पाहवा आणि वरुण कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. आता 'हीरामंडी'चा फर्स्ट लूक पाहून नेटकऱ्यांना 'गंगूबाई काठियावाडी'ची आठवण आली आहे.


संबंधित बातम्या


Sanjay Leela Bhansali: संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा; आलिया, रणबीर आणि विकी साकारणार भूमिका