Suresh Wadkar Birthday : प्रसिद्ध गायक-संगीतकार सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांचा आज (7 ऑगस्ट) वाढदिवस आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या गायकांमध्ये त्यांच्या नावाची गणना होते. सुरेश वाडकर यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अनेक चित्रपटांमधील आपला आवाज दिला आहे. त्यात 'ओंकारा', 'प्रेम रोग', 'राम तेरी गंगा मैली', 'हिना', 'रंगीला', 'माचीस' इत्यादींचा समावेश आहे. सुरेश वाडकर यांचा जन्म 7 ऑगस्ट 1955 रोजी कोल्हापूर, महाराष्ट्र येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. वयाच्या 10 व्या वर्षापासून त्यांनी त्यांचे गुरु पंडित जियालाल वसंत यांच्याकडून संगीताचे औपचारिक धडे घ्यायला सुरुवात केली होती.
सुरेश वाडकर यांनी प्रामुख्याने हिंदी आणि मराठी गायली आहे. अनेक हिट गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला आहे. हिंदी-मराठीच नव्हे तर, भोजपुरी, सिंधी आणि कोकणी भाषांमध्येही अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडची रोमँटिक गाणी, गझला असोत वा, देवाची गुणगान गाणारी भजनं त्यांचा आवाज नेहमी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडला.
स्पर्धा जिंकली आणि करिअरचा प्रवास सुरु झाला...
आपल्या मुलाने गायक व्हावं, अशी सुरेश यांच्या वडिलांची इच्छा होती. सुरेश वाडकर यांनी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली होती. 1976मध्ये त्यांनी ‘सूर सिंगार’ नावाच्या संगीत स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या परीक्षणासाठी जेष्ठ गायक आणि संगीतकार जयदेव उपस्थित होते. या स्पर्धेत आपल्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांचे आणि परीक्षकांचे मन जिंकत सुरेश वाडकर यांनी बाजी मारली. यानंतर त्यांच्याकडे चित्रपटात गाणी गाण्याच्या संधी चालून आल्या. जयदेव यांनी संगीतकार म्हणून धुरा सांभाळलेल्या ‘गमन’ या चित्रपटात ‘सीनेमें जलन आंखो मी तुफान’ हे गाणे गाण्याची संधी सुरेश वाडकर यांना मिळाली.
अनेक सुमधुर गाण्यांना दिला आवाज
संगीतकार रवींद्र जैन यांनी राजश्री प्रॉडक्शनच्या 'पहेली' चित्रपटात सुरेश वाडकर यांच्याकडून 'दृष्टी पडे टुपूर टुपूर' हे गाणे गाऊन घेतले. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सुरेश वाडकर यांना 1981मध्ये आलेल्या 'क्रोधी' चित्रपटात लता मंगेशकर यांच्यासोबत 'चल चमेली बाग में' हे गाणे गाण्याची ऑफर दिली. यानंतर त्यांनी लताजींसोबत 'प्यासा सावन' चित्रपटातील 'मेघा रे मेघा रे' सारखे सुंदर सुपरहिट गाणेही गायले. यामध्ये त्यांनी 'मेरी किस्मत में तू नहीं साहेब', 'मैं हूं प्रेम रोगी' यांसारखी मधुर गाणी मनोरंजन विश्वाला दिली. यानंतर त्यांच्या आवाजाची गोडी सर्वांनाच लागली. इथून सुरु झालेला त्यांचा हा प्रवास आजही अविरत सुरु आहे. ‘मेघारे मेघा रे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी गले लगाले’ यांसारख्या त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली. ‘प्रेमरोग’, ‘सदमा’ अशा चित्रपटातील त्यांची गाणी खूप गाजली.
मानाच्या पुरस्कारांवर कोरले नाव
त्यांच्या आवाजातील ‘सूर आनंदघन’, ‘ओमकार स्वरूपा’, ‘विठ्ठल आवडी प्रेमभावो’, ‘देवाचिये द्वारी’ अशी भक्तीगीते ऐकून श्रोते देवाच्या चरणी लीन झाले. सुरेश वाडकर यांची मुंबई आणि न्यूयॉर्कमध्ये 'सुरेश वाडकर आजीवासन संगीत अकादमी' नावाची संगीत शाळा सुरु केली आहे, ज्याद्वारे ते नवीन संगीतकार आणि गायक घडवतात. 2007मध्ये सुरेश वाडकर यांना महाराष्ट्र शासनाचा 'महाराष्ट्र गौरव पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले आहे. 2011मध्ये त्यांना 'मी सिंधुताई सपकाळ' या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा 'राष्ट्रीय पुरस्कार' मिळाला आहे. मध्य प्रदेशातील मानाचा 'राष्ट्रीय लता मंगेशकर सन्मान' देऊनही त्यांना गौरवण्यात आले. संगीतविश्वातील अमुल्य योगदानासाठी सुरेश वाडकर यांना 2020मध्ये 'पद्मश्री' पुरस्कारही देण्यात आला.
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Saurabh Ghadge : आम्ही इन्फ्ल्युन्सर नाही तर कॉन्टेंट क्रिएटर : सौरभ घाडगे