TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


'एकदा काय झालं'; सलील कुलकर्णी, सुमीत राघवन सांगणार गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट


सर्वसामान्य माणसाला गोष्टी सांगायला आणि ऐकायला आवडतात. लोकांचं गोष्टींवरचं हेच प्रेम लक्षात घेऊन, सलील कुलकर्णी  आणि सुमीत राघवन हे दोघे जण 'एकदा काय झालं' हा सिनेमा घेऊन आपल्या भेटीला येत आहेत. गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट मांडणारा हा सिनेमा असणार आहे. याच सिनेमाची पडद्यामागची गोष्ट सुमीत आणि सलील एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमामध्ये उलगडणार आहेत.


स्वातंत्र्यदिनी '38 कृष्ण व्हिला' नाटकाचा रंगणार अमृत महोत्सवी प्रयोग


कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विविध विषयांवरील नवीन नाटकं रंगभूमीवर दाखल झाली आहेत. काही येऊ घातली आहेत. नाटकाचा विषय कोणताही असो, विनोदी, गंभीर, रहस्यमय, आपल्या अनोख्या शैलीत ते नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा ज्यांचा हातखंडा आहे अशा दिग्दर्शकांमध्ये विजय केंकरे हे नाव अग्रस्थानी आहे. ‘38 कृष्ण व्हिला’ हे नवं नाटक घेऊन ते रंगभूमीवर आले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या नाटकात अभिनयाचा हुकमी एक्का असलेले अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि संवेदनशील लेखिका आणि अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे मुख्य भूमिकेत आहेत. सध्या हे नाटक रंगभूमीवर धुमाकूळ घालत असून स्वातंत्र्यदिनी '38 कृष्ण व्हिला'चा अमृत महोत्सवी प्रयोग रंगणार आहे. 


'स्ट्रगलर साला 3'चा पहिला एपिसोड आऊट


अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली युट्यूब वरील वेबसिरीज म्हणजे 'स्ट्रगलर साला'. कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर या मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या सहज विनोदी अभिनयाने बहरलेली स्ट्रगलर साला' ही वेब सिरीज आहे. या वेबसीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे प्रेक्षक या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. आता या बहुचर्चित सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


सुझान खान लवकरच बॉयफ्रेंड अरसलान गोनीसोबत अडकणार लग्नबंधनात


बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन आणि सुझान खानने घटस्फोट घेतला असला तरी त्यांची अजूनही मैत्री आहे. हृतिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सुझान अरसलान गोनीसोबत रिलेशनमध्ये आहे. तर दुसरीकडे हृतिक आणि सबा लग्न करणार अशा चर्चा होत आहेत. अशातच सुझान अरसलान गोनीसोबत लग्नबंधनाच अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. 


'टकाटक 2' मध्ये दिसणार 'अशी ही बनवाबनवी' मधील 'हृदयी वसंत फुलताना' गाण्याचे नवे रूप


मराठी सिनेमांनी इतिहास घडवत तमाम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. यापैकी काही एव्हरग्रीन संगीतप्रधान मराठी चित्रपट कायमचे रसिकांच्या मनावर कोरले गेले. यापैकीच एक आहे 'अशी ही बनवाबनवी'. या सिनेमातील गाणी आजही पॉप्युलर आहेत. कोणत्याही वयातील रसिकांच्या मनात प्रेमाचा वसंत फुलवणारं 'हृदयी वसंत फुलताना...' हे 'अशी ही बनवाबनवी'मधील एव्हरग्रीन गाणं आता नवा साज घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहे. 18 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'टकाटक 2'या सिनेमात 'हृदयी वसंत फुलताना...' हे गाणं नव्या रूपात पहायला मिळणार आहे. 'टकाटक 2'च्या निर्मात्यांनी नुकतीच या संदर्भातील घोषणा केली आहे.


'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न' 12 ऑगस्टपासून होणार सुरू


'इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न' हा भारताबाहेर आयोजित होणार सर्वात मोठा फिल्म फेस्टिव्हल आहे. या महोत्सवात समीक्षकांची पसंती मिळालेले 100 हून अधिक सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळतात. 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न' 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. तसेच या महोत्सवात 'माली'चा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. 


'लायगर' मधील 'आफत' गाणं रिलीज; विजय देवरकोंडा अन् अनन्या पांडेच्या रोमँटिक अंदाजानं वेधलं लक्ष


सध्या लायगर या आगामी चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. या चित्रपटामधील 'आफत' हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या गाण्यातील विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 


'बिग बॉस 16' 'या' दिवशीपासून होणार सुरू


'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. गेली 15 वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 1 सप्टेंबरला 'बिग बॉस 16'चा प्रीमियर होणार आहे. 


मॉडेलवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहताविरुद्ध एफआयआर दाखल!


मनोरंजन विश्वात आपले नशीब आजमवण्यासाठी आलेल्या एका अभिनेत्री-मॉडेलवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहताविरुद्ध अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 354 (विनयभंग किंवा अपमान करण्याच्या हेतूने महिलेवर हल्ला किंवा बळजबरी करणे), 354B आणि 506 (धमकी देणे) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज (6 ऑगस्ट) त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.