Rekha Birthday : अभिनेत्री रेखा (Rekha) म्हटलं की, डोळ्यांसमोर येत ते त्यांचं अतिशय सौंदर्यवान रूप. आपल्या अभिनयाने, अदाकारीने आणि सौंदर्याने रसिक प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस आहे. दर वर्षी माणसाचं वय वर्षाने वाढत जातं. पण रेखा यांच्या बाबतीत मात्र वयाने माघार घेतली असावी असं म्हटलं तर, वावगं ठरणार नाही. सरत्या वर्षांनी त्यांच्या वयात नव्हे तर सौंदर्यात आणखी भर घातली. आजघडीला त्या ज्या यशाच्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत, तिथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मार्ग अतिशय खडतर होता.


हिंदी चित्रपटसृष्टीतल्या प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये रेखा यांचे नाव अग्रक्रमी घेतले जाते. वयाच्या 68व्या वर्षीही ही सौंदर्यवान अभिनेत्री आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. चित्रपटसृष्टीत सफल ठरलेल्या रेखा यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र अतिशय कष्टप्रद होते.


अर्थार्जनासाठी अभिनय क्षेत्राकडे वळल्या!


अभिनेत्री रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नईमध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव भानूरेखा गणेशन. रेखा यांचे वडील ‘जेमिनी गणेशन’ हे तमिळ अभिनेते तर, आई ‘पुष्पवल्ली’ प्रसिद्ध तेलुगु अभिनेत्री होत्या. घरची पार्श्वभूमी अभिनयाची असली, तरी रेखा यांना अभिनयात अजिबात रस नव्हता. चेन्नईमध्ये त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. सहा बहिणी, एक भाऊ असे मोठे कुटुंब असणाऱ्या रेखा यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी रेखा यांना शिक्षण सोडून अर्थार्जनासाठी अभिनय क्षेत्राकडे वळायला लागले. वडील जेमिनी गणेशन यांनी रेखा आणि त्यांची आई पुष्पावल्ली यांना स्वीकारण्यास नकार दिला होता. या सगळ्यामुळे रेखा यांच्या बालमनावर प्रचंड आघात झाला होता. मी माझ्या वडिलांना पहिले आहे, मात्र त्यांनी मला कधीच पहिले नसावे असे त्या नेहमी म्हणतात.


13व्या वर्षी चित्रपटांत पदार्पण


वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी ‘रंगुला रत्नम’ या तेलुगु चित्रपटात बालकलाकाराची भूमिका सकारात त्यांनी आपला अभिनयाचा प्रवास सुरु केला. सुरुवातीला हिंदी भाषा अवगत नसल्याने रेखा यांना संवाद साधताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यावेळेस घरापासून लांब असणाऱ्या रेखा यांना आईची खूप आठवण येत. इतके कष्ट करूनही त्यांची दोन वेळच्या अन्नाची भ्रांत होती. याच काळात त्यांना प्रचंड मानसिक संघर्षदेखील करावा लागला होता. अभिनेत्री होण्यासाठी लागणारे रंगरूप त्यांच्याकडे नव्हते. रंगाने सावळ्या असणाऱ्या रेखा यांना यामुळे अनेकदा हिणवले गेले होते.


शिकावे, मोठे व्हावे, लग्न करून आपल्या कुटुंबासोबत सुखी जीवन जगावे, असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या रेखा यांचे नशीब बालपणी पालटले. रेखा यांनी 1969मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ऑपरेशन जॅकपॉट नल्ली सीआईडी 999’ या कन्नड चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेत्री म्हणून कारकीर्द सुरु केली. या चित्रपटात त्यांच्या नायकाची भूमिका राजकुमार यांनी साकारली होती. याच वर्षी त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘अंजना सफर’ प्रदर्शित झाला होता. मात्र, या चित्रपटातील काही विवादित दृश्यांमुळे याचे प्रदर्शन रोखले गेले आणि कालांतराने ‘दो शिकारी’ या नावाने हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.


एका चित्रपटाने बदलले आयुष्य


1960मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सावन भादों’ या चित्रपटाने रेखा यांचे जीवन बदलले. या चित्रपटाने रेखा यांना हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख मिळवून दिली. याआधी पॉपकॉर्न आणि दुध पिऊन दिवस काढणाऱ्या रेखा यांनी स्वतःकडे अभिनेत्रीच्या दृष्टीकोनातून पाहण्यास सुरुवात केली. दुसऱ्या अभिनेत्रींप्रमाणे मेकअप आणि इतर गोष्टींवर काम करण्यास सुरुवात केली. ‘घर’ चित्रपटातील रेखा यांच्या नव्या लूकने अवघी रसिकसृष्टी मोहित झाली.


राष्ट्रीय पुरस्कारांसह ‘पद्मश्री’नेही गौरव


आपल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 180हून अधिक चित्रपटांत काम केले. ‘उमराव जान’, ‘खूबसूरत’, ‘सिलसिला’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘खून भरी मांग’, ‘खिलाड़ियों का खिलाड़ी’ हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. ‘उमराव जान’ चित्रपटातील बहारदार अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारासह, राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील गौरवण्यात आले. ‘खिलाड़ियों का खिलाड़ी’, ‘खून भरी मांग’ या चित्रपटांसाठीदेखील त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल 2010मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.


हेही वाचा:


Rekha : 'तुझा अभिनय पाहण्यासाठी मी जिवंत आहे'; रेखा यांनी केले बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्याचं कौतुक


Rekha,Vinod Mehra : ...जेव्हा विनोद मेहराच्या आईनं रेखा यांना मारायला उगारली चप्पल; 'तो' किस्सा माहितीये?