Pankaj Tripathi Birthday : ‘मिर्झापूर’ फेम ‘कालिन भैया’ अर्थात अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचा आज (5 सप्टेंबर) वाढदिवस आहे. बिहारच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पंकज त्रिपाठी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने स्वतःचे स्थान मिळवले आहे. त्यांचा बॉलिवूडमधील प्रवास  वाटतो तितका सोपा नव्हता. चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आहे. त्यांनी आपल्या बहारदार अभिनयाने चित्रपटातील भूमिकांना अक्षरशः जिवंत केले आहे. पंकज त्रिपाठी यांचा जन्म 5 सप्टेंबर 1976 रोजी बिहारमधील गोपालगंज येथे झाला. एक काळ असा होता जेव्हा ते हॉटेलमध्ये नोकरी करत होते आणि तिथेच त्यांनी बॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्न पाहिले.


पंकज त्रिपाठी हे आज एक प्रसिद्ध नाव असले, तरी त्यांच्या या यशामागे एक संघर्षकथा आहे. पंकज त्रिपाठी यांचा जन्म बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंद या छोट्याशा गावात झाला. शालेय शिक्षणासोबतच त्यांनी शेतीची कामे देखील केली आणि त्यानंतर त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांना हॉटेलमध्ये नोकरीही मिळाली. मात्र, त्यांना बालपणापासून अभिनयाचे वेड होते. ते रात्री हॉटेलमध्ये काम करायचे आणि त्यानंतर सकाळी थिएटर करायचे. जवळपास 2 वर्षे त्यांचा हा दिनक्रम सुरु होता.


तुरुंगाची हवाही खाल्ली!


महाविद्यालयीन राजकारणादरम्यान पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा भाग होते आणि 1993मध्ये राज्य सरकारच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यानंतर अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ते दिल्लीला गेले आणि तेथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. मात्र,  तिथेही अनेक अडचणींचा समान केल्यानंतर आणि दोनदा नाकारले गेल्यानंतर त्यांना एनएसडीमध्ये प्रवेश मिळाला होता.


दिल्लीत थिएटर पूर्ण केल्यानंतर पंकज त्रिपाठी नशीब आजमावण्यासाठी मुंबईला आले. इथेही त्यांना खूप संघर्ष करावा लागला. 2008मध्ये त्यांना ‘बाहुबली’ नावाच्या टेलिव्हिजन मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर आठ वर्षांनी 2012मध्ये त्यांनी ‘गँग्स ऑफ वासेपूर’साठी ऑडिशन दिले, तब्बल जे आठ तास चालले होते. मात्र, याच चित्रपटाने पंकज त्रिपाठी यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली.


बॉलिवूडचे ‘एकलव्य’!


पंकज त्रिपाठी यांना बॉलिवूडचे ‘एकलव्य’ म्हटले जाते. यामागचा किस्सा स्वतः पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी सांगितला होता. पंकज तीपाठी हे अभिनेता मनोज वाजपयीचे मोठे चाहते होते. हा किस्सा सांगताना पंकज म्हणतात, ‘त्यावेळी मी मौर्या हॉटेलमध्ये किचन सुपरवायझर होतो. मला मनोज वाजपयी आल्याचा फोन आला. किचनमधल्या लोकांना माहीत होतं की, मी थिएटर करायचो, म्हणून त्यांनी सांगितलं की, मनोज वाजपयी आले आहेत. मी त्यांना भेटायला गेलो आणि म्हणालो मी थिएटर करतो. त्यांच्या पडून मी तिथून निघालो. दुसर्‍या दिवशी मला कळले की, ते त्यांच्या चपला विसरून गेले आहेत. त्यावेळी मी हाऊस कीपिंगला विनंती केली की, त्या चपला नेऊ नका, मला द्या आणि एकलव्याप्रमाणे, मी त्यांच्या चपलेमध्ये पाय ठेवून अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण केले.’


राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते पंकज त्रिपाठी यांनी ‘दबंग 2’, ‘ABCD: एनी बडी कॅन डान्स’, ‘रंगरेज’, ‘फुक्रे’, ‘अन्वर का अजब किस्सा’, ‘बरेली की बर्फी’, ‘‘गँग्स ऑफ वासेपूर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. ‘सेक्रेड गेम’ आणि ‘मिर्झापूर’सारख्या वेब सीरिजदेखील त्यांनी गाजवल्या आहेत.


हेही वाचा:


OTT Stars : कालीन भैया ते गुड्डू... सिनेमांपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे स्टार झाले कलाकार


पत्नीसोबत बॉईज हॉस्टेलमध्ये राहायचे पंकज त्रिपाठी, वॉर्डनला कळलं तेव्हा...