Junaid Khan Debut Film Maharaj :  आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खान (Junaid Khan) याचं बॉलिवूड पदार्पण लांबले आहे. जुनैदचा पदार्पणातील चित्रपट 'महाराज'च्या (Maharaj) रिलीजला गुजरात हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. या चित्रपटात झुनैद महत्त्वाची भूमिका साकारत आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कोर्टात या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली आहे. या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला आहे. अहमदाबाद आणि मुंबईत या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अहमदाबादमध्ये वैष्णव पंथाच्या अनुयांनीदेखील याचिका दाखल केली आहे. 


ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर महाराज चित्रपट 14 जून रोजी रिलीज होणार होता. मात्र,  या चित्रपटाला आता 18 जूनपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. विहिप आणि निर्माते यशराजच्यावतीने कोर्टात बाजू मांडण्यात आली होती. कोर्टाने 18 जूनपर्यंत चित्रपटाला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. पुश्ती मार्गी वैष्णव पंथाच्या अनुयांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने चित्रपटाला 18 जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. कोर्टाने यशराज फिल्मस, ब्रॉडकास्टिंग प्राधिकरण, सेन्सॉर बोर्ड, नेटफ्लिक्सला नोटीस बजावली आहे. 


महाराज हा चित्रपट आधी  14 जूनला रिलीज होणार होता. पण आता 18 जूनपर्यंत स्थगिती दिल्याने चित्रपटासाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.  या प्रकरणी यशराज फिल्म्सकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


महाराज'ची कथा काय?


'महाराज' हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित असून त्यात जुनैदसोबत जयदीप अहलावतची भूमिका आहे. हा चित्रपट 1862 च्या महाराज लिबेल केसवर आधारित आहे. हे प्रकरण भारतातील सर्वात महत्त्वाच्या कायदेशीर लढाईपैकी एक समजले जाते. चित्रपटात जुनैदने पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुलजीची भूमिका साकारली आहे. तर अहलावतने वल्लभाचार्य पंथाचे प्रमुख जदुनाथजी बृजरतनजी महाराज यांची भूमिका साकारली आहे.


 






'महाराज' मध्ये कोणते कलाकार?


'महाराज' हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नसून थेट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट कोणत्याही प्रमोशन किंवा टीझरशिवाय थेट OTT वर प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.  'महाराज' चित्रपटात जुनैद खान, जयदीप अहलावत यांच्यासह विपुल मेहता, शालिनी पांडे, शर्वरी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी 'यशराज फिल्मस एंटरटेन्मेंट'च्या बॅनर अंतर्गत केली आहे.