Prarthana Behere On Kalavantancha Ganesh : गणरायाचं (Ganeshotsav 2023) आगमन काही दिवसांवर आलं आहे. घरोघरी बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनेही (Prarthana Behere) बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे. एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये बाप्पाबद्दल बोलताना प्रार्थना म्हणाली,"बाप्पाचं आणि माझं रिलेशन हक्काचं आहे". 


एबीपी माझाशी बोलताना प्रार्थना बेहेरे म्हणाली,"आजवर मी माझ्या आई-बाबांकडे किंवा नवऱ्याकडे कधीच काही मागितलं नाही. पण बाप्पाकडे मात्र हक्काने मागत आले आहे. बाप्पाला एखादी गोष्ट मागितली तर तो हक्काने देतो. त्यामुळे बाप्पा आणि माझं हक्काचं रिलेशन आहे. माझ्या आईकडे दीड दिवसांचा बाप्पा बसतो. पण आता गेल्यावर्षीपासून आमच्या ऑफिसमध्ये बाप्पा बसवायला सुरुवात केली आहे". 


...अन् वाटलं बाप्पा माझ्या पाठीशी : प्रार्थना बेहेरे


प्रार्थना म्हणाली,"आमच्या सोसायटीमध्ये अचानक तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका काकींच्या घरी खूप पाणी आलं होतं. सर्वत्र पाणी-पाणी झालं होतं. गॅलरीतही खूप पाणी आलं होतं. दरम्यान आईला कोणीतरी सांगितलं की गॅलरीतलं चोकअप झालं हे ते काढलं पाहिजे आणि एका मुलाने मोठी लोखंडी सळई आणून आईला दिली. त्यावेळी एक्सटेंशनच्या वायर बाजूला होत्या. आई चोकअप काढत असताना लोखंडी सळई त्या वायरला लागली त्यातून करंट आला". 






प्रार्थना पुढे म्हणाली,"आईला करंट लागला आणि हळूहळू पाण्यामुळे सर्वांनाच करंट लागायला लागला. तशा परिस्थितीत मला बाप्पाची आठवण आली आणि गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आईच्या हातावर मी जोरात लाटणं मारलं. त्यानंतर आई पाण्यात पडली. पुढील चार तास ती शुद्धीत नव्हती. ही घटना घडली तेव्हा मी सातवी-आठवीत होते". 


प्रार्थना बेहेरे गणेशोत्सवात डाएट करत नाही


बाप्पाबद्दल बोलताना प्रार्थना म्हणाली,"मनापासून बाप्पाची आठवण काढली की तो नेहमीच माझ्यासाठी उभा राहिला आहे. कोरोनाकाळात मी घरी शाडूची मूर्ती आणून बाप्पाची मूर्ती स्वत: बनवली होती. यंदा शूटिंग सुरू असून बाप्पा येणार म्हटल्यावर त्याच्या स्वागताच्या तयारीला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवात मी डाएट करत नाही". 


संबंधित बातम्या


Santosh Juvekar : 'मोरया' सिनेमा मिळणं हे बाप्पाचं माझ्यावर असलेलं प्रेम : संतोष जुवेकर