Santosh Juvekar On Kalavantancha Ganesh : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. घरोघरी बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनीदेखील सजावटीच्या तयारीला सुरुवात केली आहे. अभिनेता संतोष जुवेकरसाठीही (Santosh Juvekar) गणपती बाप्पा खूप खास आहे. एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये संतोष जुवेकरने बाप्पाबद्दलचं त्याचं नातं शेअर केलं आहे. 'मोरया' सिनेमा मिळणं हे बाप्पाचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे, असं अभिनेता संतोष जुवेकर म्हणाला आहे.


संतोष जुवेकर म्हणाला,"बाप्पावर माझं वेगळच प्रेम आहे. बाप्पाकडे मी सकारात्मक एनर्जी म्हणून पाहतो. आमच्या घरी दीड दिवसांचा बाप्पा असतो. गेल्या 45 वर्षांपासून आमच्या घरी बाप्पा येत आहे. बाप्पा माझ्या पाठीशी आहे, असं मला अनेकवेळा वाटलं आहे. ज्या लोकांनी हार मानली नाही आणि कष्ट करत राहिले अशा कष्टकरी लोकांच्या पाठीशी बाप्पा नेहमीच आहे". 






संतोष जुवेकरसाठी बालपणीचा गणेशोत्सव खास


संतोष जुवेकर म्हणाला,"प्रत्येक गणेशोत्सव हा मी आनंदाने साजरा करतो. लहानपणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला आहे. वर्गनी गोळा करण्यापासून, शेण आणून स्वत:च्या हाताने अंगण सारवण्यापर्यंत, साफसफाई करणं , रात्रभर जाणून मखर बनवणं, आरत्या या सगळ्या गोष्टी आजही माझ्या आठवणीत आहेत. एकंदरीतच संतोष जुवेकरसाठी बालपणीचा गणेशोत्सव खास आहे. 



संतोष जुवेकरचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव


संतोष जुवेकर पुढे म्हणाला,"मोरया' (Morya) सिनेमा मला मिळणं हे बाप्पाचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे. बाप्पाचा सिनेमा मला करायला मिळणं माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. 'मोरया' या सिनेमात मी साकारलेला मन्या संतोष जुवेकर म्हणून मी जगलो आहे. यंदा शूटिंग सुरू असल्याने भाऊ, पुत्नी आणि मित्रांच्या मदतीने सजावट सुरू आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर आमचा भर असतो. आम्ही शाडूची मूर्ती आणून तळ्यात विसर्जन करण्यापेक्षा घरीच बाप्पाचं विसर्जन करतो आणि दुसऱ्या दिवशी ती माती सोसायटीतील झाडांना घालतो".


संतोष जुवेकरचा 'रावरंभा' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात तो जालिंदरच्या भूमिकेत दिसला होता. आता संतोषच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.   


संबंधित बातम्या


Sonalee Kulkarni : अप्सराला बाप्पा कसा पावला? सोनाली कुलकर्णी रमली गणेशोत्सवाच्या आठवणीत