Fraud Case : सध्या कोणत्याही गोष्टीचे आमिष दाखवून लोकांना चुना लावल्याची अनेक प्रकरणे चर्चेत येत आहेत. भामटे कोणत्या ना कोणत्या बहाण्याने लोकांची फसवणूक करतात. तर, काही लोक देखील अशा भामट्यांच्या आमिषाला बळी पडतात. नुकताच एका भामट्याने 21 वर्षीय तरुणीला सुपरस्टार रजनीकांतसोबत (Rajinikanth) काम मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल 10 लाखांचा चुना लावला आहे.
मुंबईत दररोज शेकडो लोक अभिनेता किंवा अभिनेत्री होण्याची स्वप्न उराशी बाळगून येत असतात. या स्वप्नांच्या नगरीत काही लोकांची स्वप्न पूर्ण होतात. तर, काहीची स्वप्न कायम अधुरीच राहतात. यात असेही लोक असतात, ज्यांची अनेक प्रकारे फसवणूक होते. एखाद्या चित्रपटात किंवा मालिकेत काम मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखोंचा चुना लावला जातो. अशी अनेक प्रकरणे सतत काबावर येत असतात. अशीच घटना एका 21 वर्षीय तरुणीसोबत घडली आहे.
भामट्यांविरोधात गुन्हा दाखल
सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत चित्रपटात काम मिळवून देतो सांगून एका भामट्याने 21 वर्षीय तरुणीला गंडवले आहे. या व्यक्तीने चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून तरुणीकडून तब्बल 10 लाख रुपये उकळले आहेत. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी पियुष जैन आणि मंथन रुपारेल यांच्याविरुद्ध भादंवि कलम 419, 420, 465, 468, 471 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय झालं?
या मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, या भामट्यांनी तिला सांगितले, त्यांची हैदराबादमध्ये वेंकटेश्वरा क्रिएशन्स नावाची कंपनी आहे, ज्याद्वारे ते आरसी-15 आणि जेलर नावाचे दोन चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटांमध्ये तिला सायबर हॅकर आणि रजनीकांत यांच्या मुलीच्या भूमिकेत घेण्यात येणार आहे. अर्थात या चित्रपटात तिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे. यानंतर त्यांनी तरुणीला सांगितले की, या चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी तिला प्रोजेक्ट कार्ड, पासपोर्ट, फॉरेक्स कार्ड, सरकारी क्लिअरन्स सर्टिफिकेट यासारख्या गोष्टी बनवण्यासाठी सुमारे 10 लाख 31 हजार 636 रुपये खर्च करावे लागतील. या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटाव्यात म्हणून या गुंडांनी तिला काही कागदपत्रे दिली आणि या चित्रपटांमध्ये तुझी निवड झाल्याचे सांगितले, असे या मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
ना काम मिळाले ना पैसे
त्यांच्या सांगण्याप्रमाणे मुलीने पैसे देखील देऊ केले. मात्र, काही काळानंतर या मुलीला कोणत्याही चित्रपटात काम मिळाले नाही. इतकेच नाही तर, या गुंडांनी तिचे पैसेही परत केले नाहीत. तेव्हा, आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर मुलीने याप्रकरणी दहिसर पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तरुणीची तक्रार नोंदवून घेतली असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा :
Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात कुठेही मुलं पळवणारी टोळी सक्रीय नाही, 'त्या' तीन घटनाही फक्त अफवाच