नवी दिल्ली : गेल्या वर्षी डिसेंबर 2017 मध्ये विराट-अनुष्का ही जोडी इटलीमध्ये विवाहबद्ध झाली. माध्यमांना चकवा देत, या दोघांनीही इटलीतील टस्कनीमधील एका आलिशान रेस्टॉरेंटमध्ये लग्न केलं. या लग्नाचे फोटो अनेक दिवस सोशल मीडियावर व्हायरल होत होते. लग्नानंतर हे दोघेही पुन्हा आपापल्या क्षेत्रात परतले आहेत. पण आता त्यांचा विवाह वादात सापडण्याची चिन्हं आहेत.


विशेष म्हणजे, या वादाचं कारण, या दोघांची मन जुळणं वगैरे नाही, तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याने ते वादात सापडण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या लग्न सोहळ्यादरम्यान, दोघांकडूनही एक चूक झाली आहे. ज्यामुळे या दोघांनाही पुन्हा विवाह करावा लागण्याची शक्यता आहे.

कारण, 11 डिसेंबरच्या इटलीतील टस्कनीमधील लग्नाची औपचारिक माहिती विराट आणि अनुष्काकडून इटलीची राजधानी रोममधील भारतीय दूतावासाला दिलेली नव्हती.

कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीने जर दुसऱ्या देशात जाऊन लग्न केले, तर त्यांना परदेशी विवाह अधिनियम 1969 अंतर्गत याची नोंदणी करावी लागते. पण विराट आणि अनुष्काने लग्नापूर्वी अशी कोणतीही नोंदणी केलेली नाही. त्यामुळे हे लग्न वाचवण्यासाठी दोघांनाही पुन्हा एकदा विवाहबद्ध व्हावं लागण्याची शक्यता आहे.

विरानुष्काच्या लग्नासंदर्भातील ही सर्व बाब एका महिती अधिकारा अंतर्गत समोर आली आहे. अंबालाच्या एका वकीलाने या दोघांच्या विवाहावरुन माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवली होती. ज्यातून हे स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, विराट कोहली सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. तर त्याच्यासोबत दक्षिण आफ्रिकेला गेलेली अनुष्का शर्मा नुकतीच मायदेशी परतली असून, ‘झिरो’ सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात करणार आहे.