मुंबई : बलात्कारी बाबा राम रहीमचं वादग्रस्त जीवन लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमाची कास्टिंगही तयार झाल्याची माहिती आहे. रजा मुराद राम रहीमच्या भूमिकेत दिसणार आहे, तर राखी सावंत हनीप्रीतच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे.


डेरा सच्चा सौदामधील दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राम रहीम सध्या रोहतकच्या जेलमध्ये आहे. तर हनीप्रीत कोर्टाच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या हिंसेनंतर गायब झाली आहे. ती सध्या नेपाळमध्ये असल्याचं बोललं जात आहे.

या सिनेमाची कथा राम रहीमच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असेल, असं बोललं जात आहे. राम रहीम रॉक स्टार बनल्यापासून ते तो तुरुंगात जाईपर्यंतची कहाणी या सिनेमात दाखवली जाण्याची शक्यता आहे. तर त्याच्या आणि हनीप्रीत यांचे संबंधही या सिनेमात दाखवले जाऊ शकतात.

या सिनेमाची शुटिंग मंगळवारपासून दिल्लीत सुरु होणार आहे. एजाज खान तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल. राम रहीम तुरुंगात गेल्यानंतर त्याच्याविषयीच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये त्याने अनेक साध्वींचा बलात्कार केल्याच्या आरोपांचाही समावेश आहे. शिवाय डेरा सच्चा सौदामध्ये अब्जावधी रुपयांचं साम्राज्य लपवल्याचंही समोर आलं.