सूरत : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा वादात अडकली आहे. जाहिरातीमुळे सांस्कृतिक मूल्यांना धक्का पोहोचवल्याप्रकरणी केंद्र सरकारकडे तिची तक्रार करण्यात आली आहे.

गुजरातमध्ये काही ठिकाणी मॅनफोर्सकडून सनी लिओनीच्या फोटोसह नवरात्रीच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग लावण्यात आली आहेत. यावर "આ નવરાત્રીએ રમો પણ પ્રેમથી" असा संदेश गुजरातीमध्ये लिहिला आहे. ज्याचा अर्थ असा आहे की "या नवरात्रीला खेळा पण प्रेमाने."

कंडोम ब्रॅण्डच्या या होर्डिंगमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचं हिंदू युवा वाहिनी या संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र चौधरी म्हणाले.



या संघटनेने सनी लिओनीचा फोटो असलेलं होर्डिंग हटवण्याची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनाही तक्रारीचं पत्र लिहिलं आहे. सनी लिओनी मॅनफोर्सची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे.

हे कदापि सहन करणार नाही, होर्डिंग तातडीने हटवले नाही तर निषेध अधिक तीव्र करु. हे भविष्यात पुन्हा घडू नये म्हणून निषेध सुरु आहे, असं नरेंद्र चौधरी यांनी सांगितलं.