Femina Miss India World 2018 : तामिळनाडूची अनुकृती वास 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2018' ची मानकरी ठरली आहे. हरियाणाची मीनाक्षी चौधरी प्रथम उपविजेती, तर आंध्र प्रदेशची श्रेया राव द्वितीय उपविजेती झाली. मुंबईतील एनएससीआय स्टेडियममध्ये 55 वी 'मिस इंडिया' स्पर्धा पार पडला.

गतविजेती मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लरने अनुकृती वास हिला 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2018'चा मुकूट घातला. मिस युनायटेड काँटिनेंट्स 2017 सना दुआने प्रथम उपविजेत्या मीनाक्षीला, तर मिस इंटरकाँटिनेंटल प्रियंका कुमारीने द्वितीय उपविजेत्या श्रेयाच्या डोक्यावर ताज ठेवला.

19 वर्षीय अनुकृती लोयोला महाविद्यालयातून फ्रेंच या विषयात पदवी शिक्षण घेत आहे. तिला मॉडेलिंग आणि अभिनयामध्ये रस आहे. अनुकृती आंतरराष्ट्रीय ब्यूटी पेजंट्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल.




30 स्पर्धकांमध्ये हा किताब जिंकण्यासाठी रस्सीखेच झाली. मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लर, क्रिकेटपटू केएल राहुल आणि इरफान पठाण, अभिनेता बॉबी देओल, कुणाल कपूर, अभिनेत्री मलायका अरोरा, फॅशन डिझायनर गौरव गुप्ता आणि पत्रकार फाये डिसूझा यांनी स्पर्धेचं परीक्षण केलं.

दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता आयुषमान खुराणा यांनी या स्पर्धेचं सूत्रसंचालन केलं. या स्पर्धेला धक धक गर्ल माधुरी दीक्षित-नेनेची उपस्थिती होती. मंचावर तिने गाणं सादर केल्यानंतर तिला 'मिसेस इंडिया'चा किताब देण्यात आला.


प्रश्नोत्तर फेरीत 12 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. अंतिम फेरीत मिस इंडिया दिल्ली, मिस इंडिया हरियाणा, मिस इंडिया झारखंड, मिस इंडिया आंध्र प्रदेश आणि मिस इंडिया तामिळनाडू या पाच जणींची निवड झाली होती. विजेती निवडण्यासाठी त्यांना 'सर्वोत्तम शिक्षक कोण? यश की अपयश?' हा प्रश्न विचारण्यात आला होता.