मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन चर्चेत आहे. कायमच आपल्या ट्वीट किंवा वक्तव्यांमुळे वादात असणारी अभिनेत्री कंगना रनौत देखील या आंदोलनावरुन पुन्हा चर्चेत आली आहे. कारण तिने शेतकरी आंदोलनाचा ना केवळ विरोध केला तर एका वृद्ध महिलेविरोधात फेक ट्वीट करत अपशब्द वापरले. या ट्वीटमुळे कंगना रनौतला सोशल मीडियावर एवढ्या टीकेचा सामना करावा लागली तिने हे ट्वीट डिलीटही केलं. आता कंगनाला या वृद्ध आजीकडून सडेतोड उत्तरही मिळालं आहे.
शेतकरी आंदोलनात सहभागी झालेली ही वृद्ध महिला सीएएविरोधी आंदोलनात सामील झालेल्या बिलकिस बानो असल्याचं कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. त्याचं उत्तरही मिळालं आहे. 'एबीपी'शी बोलताना या आजींनी आपली बाजू मांडली आहे. या आजींचं नाव मोहिंदर कौर असून त्या 73 वर्षांच्या आहे. या वयातही शेतकरी आंदोलनात कधीही सहभागी होण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर कंगनाने आपलं फेक ट्वीटही डिलीट केलं.
कंगना रनौतचं फेक ट्वीट जे तिने डिलीट केलं
बठिंडाच्या बहादूरगज जांदियां गावातील मोहिंदर कौर यांची 13 एकर जमीन आहे. कंगनाने मोहिंदर कौर यांच्या बाबतीत 100-100 रुपयांमध्ये आंदोलनात सहभागी झाल्याचं म्हटंल होतं. यावरही आजींनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, "मला कोणीतरी सांगितलं की कोणत्या तरी अभिनेत्रीने माझ्याबाबत असं लिहिलं आहे. ती कधीही माझ्या घरी आलेली नाही. मी काय करते हे तिला माहित नाही आणि ती सांगते की 100 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही अतिशय वाईट गोष्ट आहे, 100 रुपयांचं मला काय करायचंय?"
त्या पुढे म्हणाल्या की, "कंगना म्हणतेय की 100 रुपयांमध्ये आंदोलनासाठी महिला मिळातात. मी तिला 600-700 रुपये देते, तिने कापसाची एक गोणी उचलून दाखवावी. काहीही बोलते. ही तर मानसिक रोगी आहे. शेती काय असते हे तिला माहित तरी आहे का? शेतीत किती कमाई असते ते तरी तिला माहित आहे का? उन्हात, रात्री बेरात्री शेतात घाम गाळल्यावर पैस मिळतात. शेतीत पैसे कमावणं खूप कठीण असतं. कंगनाने आपली भाषा तरी सांभाळावी, काय बोलतोय याचा विचार करावा. कोणाविषयी वाईट बोलण्यापूर्वी एकदा विचार करावा. कोणाविषयी चांगला विचार करायचा नसेल तर ठीक पण वाईटही विचार करु नये. तिने सगळ्यांसाठी देवाकडे प्रार्थना करावी."
मोहिंदर कौर यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. तिन्ही मुलींची लग्न झाली असून मुलगा पत्नी आणि मुलांसह माझ्यासोबतच राहतो. मोहिंदर कौर आपल्या घरासाठी स्वत: भाज्या पिकवतात आणि आपल्या शेतीची काळजी स्वत:च घेतात. शेती अतिशय कठीण काम आहे आणि त्यामुळेच या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं त्या सांगतात. माझ्यात उत्साह आहे. मी अजूनही दिल्लीला जाऊ शकते. मी एवढी अॅक्टिव्ह आहे की शेतकऱ्यांच्या आंदोलन सहभागी होऊ शकते.
Farmer Protest | कंगना रनौतला आजीबाईंशी घेतलेला पंगा पडला महागात