Boycott Adipurush: प्रभास (Prabhas), क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाचा टीझर रविवारी प्रदर्शित झाला. मात्र, या टीझरमुळे आता चित्रपट निर्मात्यांना ट्रोल केले जात आहे. सोशल मीडिया नेटकरी या चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर भरपूर मीम्स शेअर करत आहेत. टीझर येताच त्यावर टीकादेखील सुरू झाली आहे. सैफ अली खानच्या ‘रावण’च्या लूकचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता या संपूर्ण वादात आता नेटकरी सैफ अली खानवर सडकून टीका करत आहेत.


'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर चित्रपटाविरोधात लोकांचा रोष उसळला आहे. ‘आदिपुरुष’चा टीझर पाहून काही लोक चित्रपटाच्या निर्मात्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत आहेत. चित्रपटाचा हा टीझर एखाद्या कार्टून फिल्मसारखा वाटतो, असे काहींचे मत आहे. या चित्रपटात प्रभास आणि अभिनेता सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


हा रावण की औरंगजेब?


या चित्रपटात अभिनेता प्रभास ‘भगवान रामा’ची भूमिका साकारत आहे, तर सैल अली खान ‘रावणा’ची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचा टीझर पाहून सगळेच चाहते नाराज झाले आहेत. टीझर रिलीज झाल्यापासून ‘बॉयकॉट आदिपुरुष’ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. टीझर रिलीज झाल्यापासून लोक रावणाच्या लूकवर प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. टीझरमधील रावणाचा हा लूक लोकांना अजिबात आवडला नाही. टीझरमध्ये सैफ अली खान रावण नसून, मुघल शासक औरंगजेबसारखा दिसत असल्याचे अनेक सोशल मीडिया यूजर्सचे मत आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या टीझरमध्ये रावण एका वेगळ्याच हेअर कटमध्ये दाखवण्यात आला असून, तो खूपच विचित्र दिसत आहे.



सोन्याची लंका ‘भूतबंगला’ तर, ‘पुष्पक विमान’ही दिसतंय कुरूप!


केवळ सैफ अली खानचा लूकच नाही तर, या चित्रपटात दाखवण्यात आलेले ‘पुष्पक विमान’ पाहून देखील चाहत्यांचे राग अनावर झाला आहे. ‘रामायणा’मध्ये एक अतिशय सुंदर पुष्पक विमान दिसले होते, पण दिग्दर्शक ओम राऊतच्या 'आदिपुरुष'ची तुलना हॉलिवूड चित्रपट 'गेम ऑफ थ्रोन्स'शी करण्यात आली आहे. यात दाखवलेले पुष्पक विमान अतिशय कुरूप दिसत आहे. सैफने साकारलेला रावण एका भयानक दिसणाऱ्या पक्षावर स्वार होताना दिसला आहे. नेटकरी या ‘पुष्पक विमान’रुपी पक्षाला ‘वटवाघुळ’ म्हणत आहेत. टीझरमध्ये ‘सोन्याची लंका’ एखाद्या भूतबंगल्याप्रमाणे दाखवण्यात आली आहे. राक्षसांनी भरलेली रावणाची सेनाही झोम्बी रुपात दाखवण्यात आली आहे. ओम राऊत यांनी हा चित्रपट बनवण्यात 500 कोटी वाया घालवल्याचे नेटकरी म्हणत आहेत.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: