Suraj Pawar : सैराट फेम सुरज पवार (Suraj Pawar) गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील फसवणुक प्रकरणामुळे चर्चेत आहे. मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असं आमीष दाखवून पैशांची लूट केल्या प्रकरणी सुरज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर या प्रकरणावर सुरजने भाष्य केलं आहे. त्याची फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
सुरजने लिहिलं आहे,"गेल्या दहा-पंधरा दिवसात माझी मानहानी झाली आहे. अखेर मी स्वत: राहूरी पोलीस स्टेशनला हजर झालो. पोलिसांसमोर सर्व कागदपत्रांसह माझं मत मत मांडलं. राहूरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अखेर सर्व तक्रारदारांना पोलीस स्टेशनला बोलवून त्याची खात्री करून घेतली. तर एकाही तक्रारदारची माझ्या बाबत तक्रार नव्हती. आरोपींनी बचाव हेतू ठेवून माझं नाव घेतलं होतं हे पोलीसांसमोर सिध्द झालं. अखेर माझ्यावर लागलेलं 'किटाळ' एकदाचं संपलं".
सुरजने पुढे म्हटलं आहे,"फसवणूक प्रकरणी माझं झालेलं नुकसान कधीही भरून येणार नाही. माझ्या जवळच्या लोकांचा माझ्यावरील विश्वास या प्रकरणातून उडाला. असंख्य जवळची माणसे आणि नाती माझ्यापासून दुरावली. पाच महिन्यापूर्वी माझे लग्न झालं. अशा आलेल्या बालंटा नंतर माझ्या पत्नी व तिच्या घरच्यांची परिस्थिती न सांगीतलेली बरी. या प्रकरणानंतर सुखाच्या काळात माझ्या सोबत मजा-मस्ती करणारे एकही मित्र या पडत्या काळात मदतीला धावले नाही. पण काही जवळच्या चार लोकांनी मला धीर देवून या संकटात मदत केली त्यांचा शत:शहा ॠणी आहे..!".
काय आहे प्रकरण?
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील महेश बाळकृष्ण वाघडकर यांना एक फोन आला. 'आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या सहायक कक्षाधिकारी म्हणून जागा खाली असून त्या भरायच्या आहेत. तेथे तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. काम होण्यापूर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात ऑर्डर मिळेल त्यावेळी तीन लाख रुपये द्या' असं सांगितलं फोनवरून महेश यांना सांगण्यात आलं. बेरोजगार असल्यानं वाघडकर यांनी पैसे देण्यास सहमती दर्शविली. ठरल्याप्रमाणे 4 सप्टेंबर रोजी राहुरी बस स्थानकावर दोघांमध्ये तोंडी करार झाला आणि पहिल्या टप्प्यात त्याने आरोपीस दोन लाख रुपये दिले. तर उरलेली तीन लाख रूपयांची रक्कम ही नियुक्तीपत्र आल्यानंतर देण्याचे ठरले होते. दरम्यान दोन दोन दिवसानंतर तुमचे नियुक्तीपत्र हे राहुरी विद्यापीठ येथे घेऊन येऊ असे सांगितले. त्यानुसार 9 सप्टेंबर रोजी या सर्वांची भेट झाली. परंतु, वाघडकर याना संशय आला. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
संबंधित बातम्या