जोधपूर : बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल उद्या जोधपूर कोर्टात लागणार आहे. सुनावणीसाठी जोधपूरला गेलेली अभिनेत्री तब्बूसोबत एका व्यक्तीने गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे.


जोधपूर विमानतळावर उतरल्यानंतर तब्बूला सुरक्षाकडं घालण्यात आलं. त्यावेळी आरोपीनेही सुरक्षारक्षक असल्याचं भासवून तब्बूभोवती घेराव घातला. याच बहाण्याने त्याने तब्बूला हात लावण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच तब्बू भडकली.

अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू आणि सोनाली बेंद्रे जोधपूरला पोहचले आहेत. जोधपूर सत्र न्यायालयात या प्रकरणी शिक्षा सुनावली जाणार आहे.

काय आहे प्रकरण?

राजस्थानातील जोधपूरमधल्या काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानशिवाय अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलमही आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. सलमानने शिकार केली असून इतर कलाकारांनी त्याला प्रोत्साहन दिल्याचा दावा साक्षीदारांनी केला आहे.

वीस वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाचं चित्रीकरण जोधपूरमध्ये सुरु होतं. त्यावेळी सलमानने घोडा फार्म हाऊस आणि भवाद गावात 27-28 डिसेंबरच्या रात्री हरणांची, तर कांकाणी गावात 1 ऑक्टोबरला काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.

सलमानविरोधात 1998 मध्ये चार केस दाखल करण्यात आल्या. तीन प्रकरणं हरणाऱ्या शिकारीची असून चौथं प्रकरण आर्म्स अॅक्टचं आहे. सलमानला अटक करताना त्याच्या खोलीतून पोलिसांनी पिस्तुल आणि रायफल हस्तगत केली होती. दोन्ही शस्त्रांच्या परवान्याचा कालावधी संपला होता.

कोणकोणत्या केस दाखल

1. कांकाणी गाव केस - 5 एप्रिलला फैसला होणार. गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते.

2. घोडा फार्म हाऊस केस - 10 एप्रिल 2006 रोजी सीजेएम कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. सलमान हायकोर्टात गेला. 25 जुलै 2016 रोजी त्याची सुटका करण्यात आली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली.

3. भवाद गाव केस - सीजेएम कोर्टाने 17 फेब्रुवारी 2006 रोजी सलमानला दोषी ठरवून एका वर्षाची सुनावली. हायकोर्टाने या  प्रकरणातही सलमानची मुक्तता केली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली.

4. शस्त्रास्त्र केस - 18 जानेवारी 2017 रोजी कोर्टाने सलमानची सुटका केली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागितली.

किती वर्षांची शिक्षा?

वन्य जीवन अधिनियमाच्या कलम 149 अंतर्गत काळवीट शिकारीसाठी सात वर्षांपेक्षा जास्त कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. काही वर्षांपूर्वी ही शिक्षा सहा वर्षांपर्यंत होती. सलमानचं प्रकरण 20 वर्ष जुनं आहे. अशा स्थितीत सहा वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा शक्य आहे. हे कलम सह आरोपींवरही लागू होणार.