मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा आहे ती मराठी बिग बॉसची. महेश मांजरेकर या घरात बिग बॉस असणार आहेत. यापूर्वी हिंदी बिग बॉस सीझनमध्ये हिंदी कलाकारांनी घडवलेले किस्से पाहता मराठी कलाकारांनी या मराठी सीझनचा धसका घेतला आहे.


अनेक मोठ्या कलाकारांना चॅनलकडून विचारणा झाली. पण अनेकांनी सलग तीन महिने एका घरात राहण्यास नकार दिला आहे. पण अशातही बिग बॉसचा मराठी अवतार 15 एप्रिलपासून येतो आहे.

एबीपी माझाकडे यातल्या संभाव्य कलाकारांची यादी आली. यामध्ये आता आणखी एक नाव सामील झालं आहे, ते आहे अभिनेता विकास पाटीलचं. तो यापूर्वी आपल्याला शेंटिमेंटल सिनेमातून दिसला होता.

एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार संभाव्य यादीमध्ये मेघा धाडे, सुशांत शेलार, उषा नाडकर्णी, पुष्कर जोग, राजेश शृंगारपुरे, रेशम टिपणीस यांची नावं आहेत. शिवाय यात एका कूकचा समावेशही करण्यात येणार असून त्यासाठी पराग कान्हेरे आणि विष्णूजी यांच्या नावाची चर्चा आहे. तर एमटीव्ही रोडीजमधल्या एका मराठी चेहऱ्यालाही यात संधी मिळण्याची शक्यता आहे.

सलग 100 दिवस मोबाईलविना एकाच घरात राहावं लागणार असल्याने कलाकारांच्या कमिटमेंट पाहता, या शोला अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलेली दिसते. पण या शोची असलेली उत्सुकता मात्र कमालीची आहे. येत्या 6 एप्रिलला या शोबद्दल अधिक माहिती देण्यासाठी रीतसर पत्रकार परिषदेचं आयोजनही करण्यात आलं आहे.

15 एप्रिलपासून मराठी बिग बॉसच्या पर्वाला सुरुवात

वादग्रस्त कार्यक्रमांच्या यादीत अग्रस्थानी येणाऱ्या ‘बिग बॉस’ची लोकप्रियता अनेकांना माहित आहे. हिंदीमध्ये या ‘बिग बॉस’ची अनेक पर्व पार पडली. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या दाक्षिणात्य अवतारालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता याच ‘बिग बॉस’चा मराठी अवतार येत्या 15 एप्रिलपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरु होत आहे.

नियम मोडल्यास हिंदी बिग बॉसमध्ये 50 लाख रुपये दंड होता. मात्र मराठीत तो तब्बल दोन कोटी रुपये ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धक सहभाग घेण्यापूर्वी विचार करुनच निर्णय घेतील हे मात्र नक्की.

हिंदी बिग बॉसमध्ये टोकाचे वाद, शिवीगाळ अशा प्रकारांमुळे ही मालिका नेहमीच वादात राहिली. मात्र मराठी कलाकारांची संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे या पहिल्याच पर्वात काय होतं, याबाबत प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

'मराठी बिग बॉस'च्या घरात कोण जाणार?