मुंबई : 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमामुळे अभिनेता जॉन अब्राहमच्या अडचणी वाढल्या आहेत. चित्रपट निर्माती प्रेरणा अरोराने जॉनविरोधात मुंबईच्या खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
प्रेरणा अरोराची क्रिअर्ज प्रॉडक्शन हाऊस कंपनीने जॉन अब्राहमविरोधात फसवणूक, पैशांची अफरातफर, कॉपीराईटचं उल्लंघन या प्रकरणी तक्रारीची नोंद केली आहे. जॉनने सिनेमाच्या नफ्याचा 50 टक्के भाग घेतल्यानंतर करार रद्द केला आहे, असा आरोप प्रेरणा अरोराने केला आहे.
या प्रकरणात पोलिस लवकरच जॉनची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा टळली आहे.
प्रेरणाच्या कंपनीसोबतचे करार रद्द
जॉन अब्राहमच्या जे ए एन्टरटेन्मेंटने किअर्ज एन्टरटेन्मेंटसोबत चित्रपटाशी संबंधित सर्व करार रद्द केले होते. यानंतर क्रिअर्जने उत्तर देत अशाप्रकारे करार रद्द करणं बेकायदेशीर आणि अवैध असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे हा करार रद्द केला जाऊ शकत नाही, असंही क्रिअर्जने म्हटलं होतं.
असा होता करार!
'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' साठी प्रेरणा अरोरा आणि जॉन अब्राहम यांच्यात करार झाला होता. चित्रपटाच्या निर्मितीसाठी प्रेरणा अरोराला 35 कोटी द्यायचे होते. त्यानुसार, प्रेरणाने 30 कोटी रुपये दिले होते. त्यामध्ये जॉन अब्राहमची 10 कोटी रुपयांची फी आणि इतर प्रॉडक्शन कॉस्टचा समावेश आहे. करारानुसार, निश्चित कालावधीत चित्रपटाची निर्मिती करण्याची जबाबदारी जॉनच्या जे ए एन्टरटेन्मेंटची होती.
दोन वेळा प्रदर्शनाची तारीख बदलली
सर्वात आधी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 8 डिसेंबर, 2017 निश्चित करण्यात आली होती. पण 1 डिसेंबरला 'पद्मावत' प्रदर्शित होणार होता. हा क्लॅश टाळण्यासाठी जॉनच्या टीमने रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतला. यानंतर नवी तारीख 2 मार्च ठरवण्यात आली. पण यावेळी अनुष्का शर्माच्या 'परी'सोबत सामना होणार होता. त्यामुळे क्रिअर्जने सिनेमाची तारीख पुन्हा बदलली. आता 4 मे ही नवी तारीख निश्चित करण्यात आली आहे.
अणुचाचणीवर आधारित कथा
'परमाणु- द स्टोरी ऑफ पोखरण'चं दिग्दर्शन अभिषेक शर्माने केलं आहे. सिनेमात डायना पेंटी आणि बोमन इराणी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पोखरणमध्ये 11 आणि 13 मे 1998 रोजी झालेल्या अणुचाचणीवर आधारित हा चित्रपट आहे.